दहा वर्षे नको, पाच वर्षेच द्या! - बाळ्यामामा म्हात्रे

निवडून आल्यानंतर पाच वर्षांत मतदारसंघातील समस्या सोडविल्या नाहीतर पुन्हा मत मागण्यासाठी तुमच्याकडे येणार नाही...
दहा वर्षे नको, पाच वर्षेच द्या! - बाळ्यामामा म्हात्रे

बदलापूर : निवडून आल्यानंतर पाच वर्षांत मतदारसंघातील समस्या सोडविल्या नाहीतर पुन्हा मत मागण्यासाठी तुमच्याकडे येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुरेश तथा बाळ्यामामा म्हात्रे यांनी बदलापूरकरांना साथ देण्याचे आवाहन केले.

शनिवारी संध्याकाळी बदलापूर पूर्वेकडे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी भाजप तसेच केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले. कोणत्याही मतदारसंघाच्या विकासात रस्ते, रेल्वे, आरोग्यसेवा महत्त्वाची असते. यासाठी केंद्राकडून एखादा मोठा प्रकल्प राबवता आला असता त्यातून नोकरीच्या हजारो संधी उपलब्ध करून देता आल्या असत्या. परंतु यासंदर्भात कोणतेही काम झाले नाही. अर्धवट अवस्थेत असताना बदलापूरच्या रेल्वे होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले, असा आरोप सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी केला.

बदलापूरच्या पाणी समस्येकडेही त्यांनी लक्ष्य वेधले. दहा वर्षांपूर्वी बदलापुरात कार्यालय सुरू केले असते तर लोकांच्या समस्या सोडवू शकले असते, असा टोलाही त्यांनी कपिल पाटील यांना लगावला. आपण निवडून आल्यानंतर १५ दिवसांत बदलापुरात कार्यालय सुरू करू आणि त्यामाध्यमातून नागरिकांच्या प्रत्येक समस्येकडे जातीने लक्ष देऊ, अशी ग्वाही म्हात्रे यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे, ठाणे जिल्हा महिलाध्यक्ष डॉ. रूपाली कराळे, विभागीय महिलाध्यक्ष विद्या वेखंडे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष वैभव सदाफुले आदींनीही आपले विचार मांडले. बदलापूर शहरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे काही पदाधिकारी मात्र या मेळाव्याला उपस्थित नव्हते.

वाहतूककोंडीचा फटका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्याची वेळ संध्याकाळी ७ वा. होती. मात्र वाहतूककोंडीमुळे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे सुमारे दोन तास उशिराने कार्यक्रम स्थळी पोहोचले. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in