नांदेडमध्ये भाजपला धक्का; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश

सूर्यकांता पाटील चार वेळा खासदार, तर एकवेळा आमदार राहिल्या आहेत. १० वर्षानंतर त्यांची घरवापसी होत आहे.
नांदेडमध्ये भाजपला धक्का; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश

नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तीन दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यासोबतच सुमारे १० वर्षानंतर त्यांची घरवापसी झाली आहे.

१० वर्षानंतर घरवापसी-

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. त्याचवेळी महायुतीला मात्र मोठा फटका बसला. महाविकास आघाडीनं ३० जागांवर विजय मिळवला तर महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. या निवडणूकीत भाजपला केवळ ९ जागांवर विजय मिळवता आला. आता भाजपनं आपलं लक्ष विधानसभा निवडणूकीवर केंद्रीत केलं आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सूर्यकांता पाटील यांनी भाजपा पक्ष सदस्यत्वाचा आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे.

सुर्यकांता पाटील यांची घरवापसी-

सूर्यकांता पाटील चार वेळा खासदार, तर एकवेळा आमदार राहिल्या आहेत. त्यांनी हिंगोली नांदेडचं प्रतिनिधित्व केलं आहे. ग्रामीण विकास मंत्रालयात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. त्यानंतर संसदीय कार्य मंत्रालयात राज्यमंत्रीपददेखील सांभाळलं. १९९१ मध्ये त्यांनी काँग्रेसकडून नांदेड लोकसभा जिंकली होती. १९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. २०१४ मध्ये हिंगोलीतून काँग्रेसनं राजीव सातव यांना तिकीट दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मागील 10 वर्षांपासून सुर्यकांता पाटील ह्या भाजपामध्ये काम करीत होत्या. सूर्यकांता पाटील यांची डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे. भाजपाने पाटील यांना कुठलीही जबाबदारी दिली नव्हती. त्यामुळेच सुर्यकांता पाटील ह्या भाजपा पक्षावर नाराज होत्या, असं बोललं जात आहे. त्यामुळं १० वर्षानंतर त्यांची घरवापसी झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in