इंस्टास्टार एसटी महिला वाहकाचे निलंबन अखेर रद्द

सोशल मीडियावरील प्रतिक्रियांनंतर शासनाचा निर्णय; तात्काळ कामावर रुजू होण्याचा आदेश
इंस्टास्टार एसटी महिला वाहकाचे निलंबन अखेर रद्द

काही दिवसांपूर्वी एसटीमधील स्वत:चे व्हीडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी कळंब आगारातील महिला वाहक मंगल पुरी यांच्यावर एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई केली होती. यानंतर सोशल मीडियावर एसटी महामंडळावर ताशेरे ओढण्यात येत होते. दरम्यान, जनसामान्यांचा कौल लक्षात घेत इंस्टास्टार महिला वाहक मंगल पुरींचे निलंबन प्रशासनाकडून अखेर रद्द करत त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली आहे.

एसटीमध्ये आपली जबाबदारी पार पाडत असताना इंस्टाग्रामवर व्हीडिओ आणि रिल्स केल्यामुळे महिला वाहक मंगल पुरी यांचे मागील आठवड्यात निलंबन करण्यात आले होते. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. मंगल पुरी यांच्यासोबत असलेले वाहक कल्याण कुंभार यांचे देखील निलंबन करण्यात आले होते. एसटी महामंडळाच्या या कारवाईमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. या कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई मागे घेण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियावर वारंवार करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने कारवाई मागे घेत निलंबन देखील रद्द केले आहे. तसेच तात्काळ कामावर रूजू व्हा असे आदेश एसटी महामंडळाकडून मंगल पुरींना देण्यात आले आहेत.

निलंबन रद्द केल्याच्या निर्णयाचं रोहित पवार यांच्याकडून स्वागत

माझ्यासह इतर अनेकांनी केलेल्या मागणीची दखल घेत अखेर इन्स्टास्टार मंगल पुरी या महिला वाहकाचे निलंबन रद्द करण्यात आले. याबद्दल सरकारचे आभार! भविष्यात मंगलताई एसटीच्या गणवेशाचा, आणि एसटीचा सन्मान राखतील अशी अपेक्षा,” आमदार रोहित पवार यांनी व्यक्त करत शासनाचे आभार मानले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in