नवी दिल्ली : देशातील स्वच्छ राज्य म्हणून महाराष्ट्राला पहिला, मध्य प्रदेशला दुसरा, तर छत्तीसगडला तिसरा क्रमांक मिळाला आहे, तर सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या यादीत सातव्यांदा इंदूर आणि गुजरातमधील सुरत शहराला संयुक्तपणे पहिला क्रमांक देण्यात आला. महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसऱ्या, आंध्रातील विशाखापट्टणम चौथ्या, तर मध्य प्रदेशातील भोपाळ शहर पाचव्या क्रमांकावर राहिले.
एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील सासवड, छत्तीसगडमधील पाटण व महाराष्ट्रातील लोणावळा शहराला तिसरा क्रमांक मिळाला. गंगाकिनाऱ्यावरील स्वच्छ शहरातील यादीत वाराणसीला पहिला, प्रयागराजला दुसरा क्रमांक मिळाला. मध्य प्रदेशातील महूला सर्वात स्वच्छ कन्टोन्मेंट बोर्डाचा पुरस्कार मिळाला, तर सर्वोत्कृष्ट सफाईमित्र सुरक्षित शहराचा पुरस्कार चंदीगडला देण्यात आला.
दिल्लीतील भारत मंडपम कन्वेंशन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप पुरी यांनी विजेत्या राज्यांच्या प्रतिनिधींचा पुरस्कार देऊन सन्मान केला. २०२२ मध्ये मध्य प्रदेश देशातील स्वच्छ राज्य होते. त्याला मागे टाकून महाराष्ट्राने स्वच्छ राज्याचा पहिला क्रमांक पटकावला आहे. १०० हून अधिक शहर असलेल्या राज्यात मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक आला. २०१६ ला ७३ शहरे स्पर्धेत होती. तेव्हा इंदूर क्रमांक एकवर होता. यंदा ४३५५ शहरे स्पर्धेत होती. तरीही इंदूरने पहिला क्रमांक कायम ठेवला.
नवी मुंबई, इंदूर, सुरत कचरामुक्त शहरांचे सप्ततारांकित मानांकन
स्वच्छ सर्वेक्षण- २०२३ मध्ये नवी मुंबई, इंदूर, सुरतला कचरामुक्त शहरांचे सप्ततारांकित मानांकन मिळाले आहे. कचरामुक्त शहरात घरोघरी कचरा संकलन, कचऱ्यावर प्रक्रिया, निवासी व व्यावसायिक भागात स्वच्छता, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता आदी निकष होते.
जगातील सर्वात मोठे स्वच्छता सर्वेक्षण
भारताचे स्वच्छता सर्वेक्षण जगातील सर्वात मोठे सर्वेक्षण आहे. २०१६ पासून याची सुरुवात झाली. तेव्हा यात ७३ शहरे होती. आता ही संख्या ४५०० वर गेली आहे. यंदा ‘कचऱ्यापासून संपत्ती’ ही संकल्पना राबवली. १ जुलैपासून तीन हजार कर्मचाऱ्यांवर स्वच्छता मूल्यांकनाचे काम सोपवले होते. यासाठी ४६ निकष लावले, तर १२ कोटी नागरिकांकडून प्रतिक्रिया घेण्यात आल्या.
महाराष्ट्राचा डंका
स्वच्छ राज्य - महाराष्ट्र (पहिले)
देशातील तिसरे स्वच्छ शहर - नवी मुंबई
लाखांपेक्षा कमी लोकसंख्येचे शहर - सासवड (पहिला), लोणावळा - (तिसरे)
कचरामुक्त शहर- नवी मुंबई