Viral Video: धबधब्यात उडी मारणं जिवावर बेतलं, पुण्यातील राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू; पाहा नेमकं काय घडलं?

भारतीय सैन्यदलातील १८ वर्षांच्या सेवेनंतर स्वप्नील धावडे अलीकडेच निवृत्त झाले होते. त्यांच्या मृत्यूनं हळहळं व्यक्त केली जात आहे.
Viral Video: धबधब्यात उडी मारणं जिवावर बेतलं, पुण्यातील राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू; पाहा नेमकं काय घडलं?
Published on

पुणे : लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा रविवारी (३० जून) धबधब्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यातील ताम्हिणी घाटात अशीच एक दुर्घटना घडली आहे. मित्रांसोबत फिरायला आलेला एक तरूण स्टंट करण्याच्या नादात धबधब्यात वाहून गेला आणि मृत्यूमुखी पडला. स्वप्नील धावडे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील रहिवाशी होते. सैन्यदलात १८ वर्ष सेवा बजावल्यानंतर स्वप्नील धावडे अलीकडेच निवृत्त झाले होते. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्टंट करणं जिवावर बेतलं...

गेल्या काही दिवसांत राज्यभरात मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळं अनेक पर्यटक मान्सून पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी विविध ठिकाणी हजेरी लावत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिले होते. त्याच आधारे त्यांची भारतीय सैन्यादलात निवड झाली होती. १८ वर्षांच्या सेवेनंतर ते मागील वर्षी निवृत्त झाले होते. त्यांची पत्नी पिंपरी चिंचवड पोलिस दलात कार्यरत आहेत. स्वप्नील सध्या जिम ट्रेनर म्हणून काम करत होते. शनिवारी ते आपल्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. शनिवारी हा ग्रुप ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे गेला होता. स्वप्निल यांनी स्टंट करत धबधब्यात उडी मारली. त्यानंतर त्यानं बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा जोरदार प्रवाहात त्याला बाहेर येता आलं नाही आणि तो बेपत्ता झाला आहे. विशेष म्हणजे स्वप्निलच्या या स्टंटचा व्हिडिओ त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी रेकॉर्ड केला आहे. यामध्ये तो एका उंच ठिकाणाहून पाण्यात उडी मारताना दिसत आहे. तसेच त्यानंतर त्यानं बाहेर येण्यासाठी केलेली धडपडही दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.

दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर मृतदेह शोधण्यात यश-

दरम्यान ताम्हिणी घट परिसरात पावसाचा जोर कायम असल्यामुळं प्लस व्हॅलीच्या कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळं शोधकार्यात अडचणी येत होत्या. पौंड पोलीस, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, शिवदुर्ग टीम लोणावळा या सर्वांनी संयुक्तपणे स्वप्निलचा शोध मोहिम राबविली. मात्र, या टीमला कोठेही स्वप्नील आढळला नाही. रविवारी सकाळी आठ वाजता सुरु झालेलं हे शोधकार्य सोमवारी सकाळपर्यंत सुरु होतं. दरम्यान रायगड जिल्ह्यातील मानगाव येथे स्वप्निलचा मृतदेह आढळून आला.

logo
marathi.freepressjournal.in