

कराड : सातारा-सांगली सीमेजवळील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली राष्ट्रीय उद्यानात व्याघ्र संवर्धनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले असून, एसटीआर टी-०४ या वाघिणीला नियंत्रित अनुकूलन प्रक्रियेनंतर १८ नोव्हेंबर रोजी नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. सध्या ही वाघीण जंगलात स्वावलंबी जीवन जगत असून तिचा मुक्त व डौलदार संचार फील्ड टीमच्या सतत निरीक्षणात असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
वाघिणीला नियंत्रित पिंजऱ्यात (Soft Release Enclosure) काही काळ ठेवून तिच्या शिकार क्षमता, हवामानाशी जुळवून घेणे, नैसर्गिक प्रतिसाद, क्षेत्रनिशाणीकरण यांचे निरीक्षण करण्यात आले. पिंजऱ्याचा दरवाजा मुक्त ठेवूनही दोन दिवस ती आतच राहिली आणि स्वतः शिकार करूनच वास्तव्य केले. अखेर २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता ती बाहेर पडून जंगलाच्या दिशेने रवाना झाली.
तांत्रिक आणि वैज्ञानिक निरीक्षण सुरू
वाघिणीच्या मानेवर रेडिओ कॉलर (Satellite + VHF Tracking) बसवण्यात आले असून तिच्यावर २४ तास देखरेख ठेवली जात आहे. निरीक्षणासाठी Sahyadri Tiger Reserve + Chandoli National Park + Wildlife Institute of India (WII) यांची संयुक्त प्रशिक्षित पथके कार्यरत आहेत. यामध्ये उपग्रह व VHF आधारित हालचालींचे पर्यवेक्षण, फील्ड पथकाद्वारे स्थळ पडताळणी, शिकार पॅटर्न व निवासस्थानाची नोंद, मानव-वन्यजीव संघर्ष प्रतिबंधक उपाय आणि तत्पर Veterinary Rapid Response व्यवस्था करण्यात आली आहे.
भविष्यात व्याघ्र पर्यटनाला चालना
या उपक्रमामुळे व्याघ्र पुनर्वसन व संवर्धनाला गती मिळणार असून सह्याद्रीत टायगर टूरिझम वाढीस चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या मोहिमेत WII शास्त्रज्ञ रमेशकुमार, विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील यांच्यासह अनेक वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.