सिंधुदुर्ग पर्यटनाला पंचतारांकित झळाळी; वेंगुर्लेतील शिरोडा-वेळाघर येथे ‘ताज’ समूहाचे हॉटेल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा-वेळाघर येथे ‘ताज’ समूहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित (५-स्टार) हॉटेल उभारले जाणार आहे.
सिंधुदुर्ग पर्यटनाला पंचतारांकित झळाळी; वेंगुर्लेतील शिरोडा-वेळाघर येथे ‘ताज’ समूहाचे हॉटेल
सिंधुदुर्ग पर्यटनाला पंचतारांकित झळाळी; वेंगुर्लेतील शिरोडा-वेळाघर येथे ‘ताज’ समूहाचे हॉटेलPhoto : X (@NiteshNRane)
Published on

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा-वेळाघर येथे ‘ताज’ समूहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित (५-स्टार) हॉटेल उभारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ठळक ओळख निर्माण होणार आहे.

हा प्रकल्प सिंधुदुर्गच्या विकासाचा मैलाचा दगड ठरणार असून, त्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. शिरोडावेळाघर येथील जमिनीबाबत मे. इंडियन हॉटेल कंपनी प्रा. लि. (ताज समूह) यांनी सादर केलेल्या पूरक करारपत्रावर चर्चा करण्यासाठी आज पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ताज समूहाच्या प्रतिनिधींंसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC), स्थानिक ग्रामस्थ आणि ताज समूह यांच्यात लवकरच सामंजस्य करार (MoU) करण्यात येणार आहे.या बैठकीस आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे (ऑनलाईन), ताज समूहाचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ग्रामस्थांना दोन टप्प्यांत मोबदला

बैठकीत स्थानिक ग्रामस्थांना दोन टप्प्यांत मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा मोबदला एक ते दोन आठवड्यांच्या आत अदा करावा, तसेच यासंदर्भातील सर्व प्रलंबित केसेस मागे घ्याव्यात, अशा स्पष्ट सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

रोजगार व स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना

या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती, पर्यटनाशी निगडित व्यवसायांना गती,स्थानिक हस्तकला, वाहतूक, हॉटेल व सेवा क्षेत्राचा विकास होणार आहे. उच्च दर्जाचे देशी-विदेशी पर्यटक जिल्ह्याकडे आकर्षित होऊन सिंधुदुर्गचा पर्यटन विकास नव्या उंचीवर पोहोचणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in