एसटी कामगारांच्या वेतनाचा मार्ग मोकळा; शासन निर्णय जारी : ८७ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचारी व अधिकारी यांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
एसटी कामगारांच्या वेतनाचा मार्ग मोकळा; शासन निर्णय जारी : ८७ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचारी व अधिकारी यांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. एसटी महामंडळाला सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी ३५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय गृह विभागाने जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ८७ हजार एसटी महामंडळातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना दर महिन्याच्या सात तारखेला वेतन मिळत होते. कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर महामंडळाची आर्थिक घडी विस्कटली. त्यानंतर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यात अडचण येऊ लागली. वेतन व महामंडळाच्या खर्चाला कमी पडणारी रक्कम प्रशासनाला दर महिन्याला देऊ, असे लेखी आश्वासन संपानंतर शासनाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने उच्च न्यायालयात दिले होते. मात्र गेल्या दीड वर्षापासून प्रवासी कराची शासनाला देय असलेली ७८० कोटी रुपयांची रक्कम शासनाला तत्काळ भरणा करा, अन्यथा या महिन्यात शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येणार नाही, अशी अट घातली आहे. त्यामुळे या महिन्यातील वेतन कर्मचाऱ्यांना द्यायचे कसे? असा प्रश्न एसटी समोर निर्माण झाला होता.

मार्च २०२४ चे सवलतमूल्य उपलब्ध करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी शासनास विनंती केली होती. त्यानुसार गृह विभागाने महामंडळास मार्च २०२४ चे सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न मार्गी निघणार आहे.

शासन निर्णय निघाला तरी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन आज खात्यावर जमा होणार नाही. शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने वेतन सोमवारी संध्याकाळी जमा होईल. म्हणजेच साधारण आठ दिवस वेतन उशिरा मिळेल. - श्रीरंग बरगे - महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस

logo
marathi.freepressjournal.in