अभिनय क्षेत्रातून ५ वर्षे ब्रेक घेणार; अमोल कोल्हे यांचा जनतेच्या सेवेसाठी निर्णय

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी त्यांचा मोठा निर्णय जाहीर केला.
अभिनय क्षेत्रातून ५ वर्षे ब्रेक घेणार; अमोल कोल्हे यांचा जनतेच्या सेवेसाठी निर्णय
Published on

पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी त्यांचा मोठा निर्णय जाहीर केला. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यालाच माझे प्राधान्य आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रातून ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीच हरकत नाही. काही दिवसांसाठी नाही, तर ५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेईन, ही माझी शिरुरच्या जनतेसाठी कमिटमेंट आहे, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी पुन्हा खासदार झाल्यास आपण ५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्राला रामराम करणार असल्याचे स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यातील शिरुर व मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत आहे. अजित पवारांनी आपल्या उमेवाराला निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी ताकद पणाला लावली आहे. गुरुवारी अजित पवारांनी या मतदारसंघात सभा घेऊन एका आमदाराला सज्जड दमही दिला. त्यामुळे, ही लढाई पवार विरुद्ध पवार अशी प्रतिष्ठेची बनली आहे.

डॉ. अमोल कोल्हे हे मुख्यत्वे अभिनेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले आहेत. मात्र, राजकारणात आल्यानंतर, खासदार झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनयाचा संदर्भ देत टीका करण्यात आली.

या व्यतिरिक्त स्क्रीनवर दिसणार नाही

छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे एवढाच अपवाद राहील. त्यामुळे या व्यतिरिक्त मी तुम्हाला स्क्रीनवर दिसणार नाही, असे म्हणत कोल्हेंनी पुढील ५ वर्षांसाठीची भूमिका स्पष्ट केली.

logo
marathi.freepressjournal.in