१६ आमदारांच्या अपात्रतेवर लवकर निर्णय घ्या!ठाकरे गटाची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या चौकटीतच आम्ही १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याची मागणी केल्याचे प्रभू यांनी सांगितले
 विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने सोमवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना भेटून केली. यावेळी शिष्टमंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत आणि मागणीचे निवेदन झिरवळ यांना दिले.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर गेल्या आठवड्यात ११ मे रोजी निकाल दिला. ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. या मागणीवर विधानसभा अध्यक्षांनी सुयोग्य वेळेत निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी विधानभवनात झिरवळ यांची भेट घेतली.

या भेटीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी उपाध्यक्षांकडे आम्ही न्यायालयाच्या निकालाची प्रत आणि मागणीचे निवेदन सोपवल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीची प्रक्रिया सुरू करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आम्ही पत्राद्वारे केली आहे. मणिपूरमध्ये जशी लवकर सुनावणी झाली, तशी सुनावणी व्हावी, असेही प्रभू म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित नसल्याने आम्ही उपाध्यक्षांना भेटून निवेदन दिले. आमचे निवेदन उपाध्यक्षांमार्फत अध्यक्षांकडे जाईल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या चौकटीतच आम्ही १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याची मागणी केल्याचे प्रभू यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे आमदार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in