महाविकास आघाडीची बैठक २८ फेब्रुवारीला घ्या

२७ तारखेला पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या सत्ता परिवर्तन महासभेमुळे बैठकीला जाणे शक्य होणार नाही.
महाविकास आघाडीची बैठक २८ फेब्रुवारीला घ्या

प्रतिनिधी/मुंबई: महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची जागा वाटपासंदर्भात २७ फेब्रुवारीला होणारी बैठक पुढे ढकलून ती २८ फेब्रुवारीला घ्यावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. २७ फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी प्रकाश आंबेडकर तयार होते. मात्र, २७ तारखेला पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या सत्ता परिवर्तन महासभेमुळे बैठकीला जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे बैठकीची तारीख जर २७ ऐवजी २८ होणार असेल तर आम्ही येऊ, असे आंबेडकर यांनी जयंत पाटील यांना कळवले आहे.

महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी २७ फेब्रुवारीला बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी आंबेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. याबाबतची माहिती स्वत: आंबेडकर यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमातून दिली. “आम्ही २७ तारखेच्या बैठकीला येऊ शकत नाही. पुण्याला वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आहे. महाराष्ट्राची पूर्ण राज्य समिती पुण्यात असणार आहे. त्यामुळे २८ तारखेला बैठक शक्य होत असेल तर आपण तेव्हा येऊ,” असा निरोप जयंत पाटील यांना दिल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in