

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे निर्माण झालेली रखरख आणि वाढते तापमान कमी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील तळेकांटे ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. गावातील हजार ते दीड हजार रहिवाशांनी एकत्र येत महामार्गाच्या दुतर्फा दोन हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेची सुरुवात येत्या २८ जून रोजी सप्तलिंगी पूल ते बावनदी पुलापर्यंतच्या चार किलोमीटर अंतरावर श्रमदानाने करण्यात येणार आहे.
या उपक्रमाची पार्श्वभूमी मे महिन्यात झालेल्या गावातील एका कार्यक्रमात दडली आहे. मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांना अवकाळी पावसामुळे दोन दिवस वीज नसलेल्या स्थितीत राहावे लागले. यादरम्यान झालेल्या चर्चेतून महामार्गाच्या कामासाठी सोळा वर्षांपूर्वी तोडलेल्या झाडांची उणीव सर्वांना प्रकर्षाने जाणवली. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांच्या संकल्पनेतून गावकऱ्यांनी सरकारी मदतीची वाट न पाहता स्वतः वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. वड, पिंपळ, चिंच आणि उंबर यांसारख्या स्थानिक प्रजातींच्या झाडांची निवड करण्यात आली असून, महामार्गाचे वाढलेले तापमान आणि हवामान बदलाचा धोका कमी करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.
वृक्षारोपणासह झाडांच्या संगोपनासाठी ग्रामस्थांनी निधी संकलनाचे आवाहन केले आहे. महामार्गासाठी सातत्याने आंदोलने होत असताना, २८ जून रोजी रस्ता अडवण्याऐवजी वृक्षारोपणासारखा विधायक मार्ग निवडल्याने तळेकांटे गावाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन इतर गावेही महामार्गावर हिरवळ निर्माण करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
निधी संकलनाचे आवाहन
झाडांना संरक्षण देण्यासाठी लोखंडी जाळ्या आणि पुढील वर्षापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकरची व्यवस्था गावकरी स्वतःच्या ताकदीवर करणार आहेत. या कार्यात परदेशात आणि शहरात राहणारी गावातील तरुणाई समाज माध्यमांच्या माध्यमातून सक्रिय झाली असून, जुन्या जाणत्या लोकांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहे.