पक्ष संघटना सक्षम करण्याचा तालुका काँग्रेसचा निर्धार

आमराई येथील आशीर्वाद सभागृहात काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पक्ष संघटना सक्षम करण्याचा तालुका काँग्रेसचा निर्धार

कर्जत : कर्जत तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत पक्ष संघटनेवर भर देण्यात आला. येत्या काही दिवसात तालुक्याचा दौरा करून असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना एकत्रित करून विविध पदांवर नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषतः सहकार विभागाच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचे ठरले असून पक्ष संघटना सक्षम करण्याचा निर्धार करण्यात आला.

आमराई येथील आशीर्वाद सभागृहात काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय इंदिरा गांधी व माजी आमदार स्व. तुकाराम सुर्वे यांना अभिवादन करून बैठकीची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी तालुका अध्यक्ष संजय गवळी, माजी तालुकाध्यक्ष अरविंद पाटील, प्रदेश प्रतिनिधी मुकेश सुर्वे, जिल्हा सरचिणीस संदीप सोनटक्के, नेरळ शहर काँग्रेस अध्यक्ष आनंद मोडक, उमरोली जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष बळीराम काळोखे, गोपीनाथ देशमुख, सुभाष मदन, संदीप पाटील आदी उपस्थित होते. कर्जत शहर अध्यक्ष अनंत देवळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश सांगितला.

अरविंद पाटील यांनी, 'मी दोन वेळा तालुका अध्यक्ष होतो. त्यावेळची काम करण्याची पद्धत आणि आताची काम करण्याची पद्धत यात खूप फरक आहे. त्यावेळचे कार्यकर्ते निष्ठावंत होते. त्यामुळे कोणत्याही गावात जाऊन प्रचार कार्य करण्यास वेगळाच हुरूप येत असे. आपण तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे.' स्पष्ट केले. पूर्वी सहकारात आपला दबदबा होता. तो पुन्हा निर्माण करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची गरज आहे.

त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.' असे सूचित केले. संजय गवळी यांनी, ' राहुल गांधी यांची यात्रा आपल्या भागातून जात आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक विभागात गाव कमिटी तसेच प्रत्येक ग्रामपंचायती नुसार कमिटी स्थापन करून कार्यकर्त्यांना पक्ष बळकटी करण्यासाठी सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांच्य पदांची नियुक्ती करताना सर्वांना सारखा न्याय देण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्याची तयारी आपण सर्वांनी करावी.' असे सांगितले. आनंद मोडक यांनी आभार मानले.

logo
marathi.freepressjournal.in