.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
गेल्या काही तासांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. खासकरून मुंबई, पुणे, ठाणे तसेच रायगडला पावसानं झोडपून काढलं आहे. पुण्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शेकडो घरांमध्ये पाणी घुसलं आहे. प्रशासनाकडून मदत व बचावकार्य वेगानं सुरु आहे. दरम्यान रायगडमध्ये पावसाचा जोर खूप वाढला आहे. मुसळधार पावसामुळे रायगड मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातून वाहतूक बंद करण्यात आली आहे. साधारणपणे पुढील ६-८ तास बंद राहू शकतो, असं माणगावच्या तहसिलदारांनी सांगितलं आहे.
रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात मुळशी हद्दीमध्ये काही ठिकाणी तसेच माणगाव हद्दीत तीन ठिकाणी दरड कोसळून रस्त्यावर माती आलेली आहे. मुळशी हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात दरड रस्त्यावर कोसळलेली असून एक व्यक्ती मुळशी हद्दीत मृत झाल्याचे समोर आलं आहे.
माणगाव हद्दीतील रस्त्यावर आलेली माती जेसीबी द्वारे दूर करण्याचे काम सुरू आहे. जीवित हानी नाही. परंतु पाच ते सहा ठिकाणी रस्त्यावर माती आलेले असून बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर झाडे पडलेले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून पुणे-कोलाड रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. किमान सहा ते आठ तास रस्ता सुरळीतपणे सुरू होण्यासाठी लागण्याची शक्यता आहे असे माणगावच्या तहसिलदारांनी सांगितले.