आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण ठरला फार्स; नेमकं प्रकरण काय?

सोमवारी रात्री उशीरा पत्रकार परिषद घेऊन मुलगा परत आल्याचं सावंत आणि पोलिसांनी सांगितलं.
ऋषिराज सावंत, तानाजी सावंत (डावीकडून)
ऋषिराज सावंत, तानाजी सावंत (डावीकडून)
Published on

पुणे : तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुण्यातून अपहरण झाल्याच्या वृत्ताने सोमवारी खळबळ माजली होती. मात्र, या वृत्तात तथ्य नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज पुण्यामध्ये परतला असून चार्टर विमानाने तो बँकॉकला जात असल्याचे स्पष्ट झाले. ऋषिराजसोबत त्याचे दोन मित्र देखील होते. यादरम्यान ऋषीराजने चार्टर्ड प्लेनसाठी जवळपास ६८ लाख रुपये खर्च केल्याचे समजते.

तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा नेमका बँकॉकला कशासाठी जात होता याची चौकशी अद्याप सुरू आहे. या प्रकरणावर बोलताना तानाजी सावंत म्हणाले, पहाटे उठून त्याने अभिषेक केला होता. त्यानंतर तो सकाळी आवरून कॅम्पससाठी निघाला होता. पण त्याची ही अचानक टूर ठरली याबद्दल मला माहीत नव्हते. तो नेमका कशासाठी गेला होता हे भेटल्यानंतर कळेल.

पोलिसांनी यावर बोलताना सांगितले की, आम्हाला तक्रार अशाच प्रकारची मिळाली होती की ऋषिराज सावंत याचे अपहरण झाले आहे, तो बेपत्ता आहे. त्यामुळे त्यानुसार आम्ही तपास चालू केला होता. मात्र, पुढील चौकशीमध्ये तो बँकॉकला निघाले असल्याचे आम्हाला समजले. त्यानुसार मग आम्ही वैमानिकाला संपर्क साधून अर्ध्या रस्त्यातूनच ते विमान पुन्हा पुण्यामध्ये बोलावले. माहितीनुसार, हे विमान अंदमान-निकोबारपर्यंत पोहोचले होते. मात्र वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान चेन्नईला उतरवण्यात आले, तेथून रात्री ९ वाजेच्या सुमारास ते पुण्यात परतले. रात्री उशीरा पत्रकार परिषद घेऊन मुलगा परत आल्याचं सावंत आणि पोलिसांनी सांगितलं.

logo
marathi.freepressjournal.in