मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची स्लो बॅटिंग सुरु असली तरी धरणातील पाण्याच्या पातळीत हळुवार वाढ होत आहे. सात धरणांपैकी तुळशी तलाव गुरुवार २० जुलै रोजी मध्यरात्री १.२५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. त्यानंतर ५ दिवसांनंतर एकाच दिवशी तानसा व विहार तलाव ओव्हर फ्लो झाल्याने मुंबईकरांसाठी ही खुशखबर आहे. दरम्यान, सातही धरणात ५८.९३ टक्के म्हणजे ८ लाख ५२ हजार ९५७ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला असून २२१ दिवस पुरेल इतका आहे. दरम्यान, धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने २१ फेब्रुवारीपर्यंत मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याचे नो टेन्शन.
जून महिना कोरडा गेल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याने तळ गाठला. सातही धरणात ७ टक्केच पाणी साठा असल्याने १ जुलैपासून मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. जुलै महिन्यात धरण क्षेत्रात पावसाची दमदार इनिंग होईल, असे वाटत असताना पावसाने मुंबईकरांची चिंता वाढली. जुलै अखेरपर्यंत धरणांतील पाणीसाठ्यात किती वाढ झाली याचा आढावा घेत आणखी पाणी कपात करायची का याबाबत निर्णय घेण्याचा विचार सुरु असतानाच एकाच दिवशी तानसा विहार तलाव ओसंडून वाहू लागले. विहार तलाव मध्यरात्री १२.४८ मिनिटं तर तानसा तलाव पहाटे ४.३५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी तीन तलाव ओसंडून वाहू लागल्याने मुंबईवरील आणखी १० टक्के पाणी कपातीची चिंता काहीशी मिटली आहे.
मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. सध्या सातही धरणात ८ लाख ५२ हजार ९५७ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा पाणीसाठा फेब्रुवारीपर्यंत मुंबईकरांची तहान भागवेल इतका उपलब्ध झाला आहे.
धरणांतील पाणी साठा ( दशलक्ष लिटर)
मोडक सागर - १,१३,०५६
मध्य वैतरणा - १,३१,५०३
अप्पर वैतरणा - ७१,३२९
भातसा - ३,५६,३७८
तानसा - १,४४,४९६
तुळशी - ८,०४६
विहार - २७,६९८