तपोवन वृक्षतोडीबाबत चर्चा ठरली निष्फळ; प्रशासन-पर्यावरणप्रेमी आपापल्या मुद्द्यांवर ठाम

लासलगाव येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी येथील तपोवनातील वृक्षतोडीसंदर्भात सोमवारी नाशिक महापालिकेत महत्त्वाची बैठक निष्फळ ठरली. पर्यावरणाचे प्रतिनिधी व मनपा अधिकारी आपापल्या मुद्द्यांवर ठाम राहिले.
तपोवन वृक्षतोडीबाबत चर्चा ठरली निष्फळ; प्रशासन-पर्यावरणप्रेमी आपापल्या मुद्द्यांवर ठाम
तपोवन वृक्षतोडीबाबत चर्चा ठरली निष्फळ; प्रशासन-पर्यावरणप्रेमी आपापल्या मुद्द्यांवर ठाम
Published on

लासलगाव : येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी येथील तपोवनातील वृक्षतोडीसंदर्भात सोमवारी नाशिक महापालिकेत महत्त्वाची बैठक निष्फळ ठरली. पर्यावरणाचे प्रतिनिधी व मनपा अधिकारी आपापल्या मुद्द्यांवर ठाम राहिले.

कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्राम उभारणीसाठी तपोवनातील वृक्षतोड करावी लागणार, ही मनपा प्रशासनाची भूमिका ठाम आहे. मात्र, पर्यावरणप्रेमींचा या भूमिकेला विरोध आहे. तपोवनातील एकही झाड तोडून देणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

नाशिक महापालिका प्रशासनाकडून झाडांबाबत कोणतीही योग्य माहिती मिळाली नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे, तर एक्झिबिशन सेंटरसाठी झाडं तोडणार नसल्याचा खुलासा मनपा आयुक्तांनी केला. मात्र, त्याबाबतचा जीआर काढण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. बैठक निष्फळ झाल्याने पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच आहे, तर पालिका आयुक्तांनी पर्यावरणप्रेमींशी चर्चा सुरूच राहणार असल्याची माहिती दिली आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या की, आम्ही बैठक बोलावली होती. अजूनही काही पर्यावरणप्रेमीसोबत बैठक घेणार आहोत. काही गोष्टींवर चर्चा झाली. साधुग्रामसाठी झाडी तोडणे हे काही लोकांना मान्य आहे. मात्र काही लोकांना मान्य नाही. आजच्या बैठकीचे व्हिडीओ शूटिंग करण्यात आले आहे. आता सर्व झाडांचा सर्व्हे झाला आहे. अजून उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांचा सर्व्हे बाकी आहे. जुने झाडी काढणार नाही. वृक्ष प्राधिकरणाची बैठक होईल, त्यानंतर किती झाडे तोडणार याबाबत आकडा सांगितला जाईल. गेल्या कुंभमेळ्यामध्ये तीन शेड उभे केले होते. आता देखील तंबू उभे करावेच लागणार आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

ही जागा खरेदी केलेली आहे. इथे रिक्रियेशन सेंटर उभे करायचे, असा निर्णय मनपाच्या सर्वसाधारण सभेत झाला होता. २०१६ च्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला होता. ११ वर्ष जागेचा वापर करावा. नंतर एक वर्ष ती जागा कुंभमेळ्यासाठी वापरली जाणार, असा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in