
मुंबई : मुंबईतील शिक्षण निरीक्षकांनी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चारित्र्य पडताळणी करून चारित्र्य प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश सर्व शाळांना दिले आहेत. त्यामुळे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी प्रधान सचिव यांना पत्र लिहून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चारित्र्य प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना संदर्भात सर्वसमावेशक सूचना देण्यात आल्या आहेत. या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या चारित्र्य पडताळणीच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाहीमधील ६.१ चा संदर्भ देऊन मुंबईतील शिक्षण निरीक्षकांनी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चारित्र्य पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत.