‘नीट’प्रकरणी शिक्षकाला अटक

‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकाराचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील लातूरपर्यंत पोहचले आहेत.
‘नीट’प्रकरणी  शिक्षकाला अटक
स्क्रीनशॉट, एक्स @NCMIndiaa
Published on

लातूर : ‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकाराचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील लातूरपर्यंत पोहचले आहेत. दहशतवादविरोधी पथकाने लातूर येथील जि. प. शिक्षक संजय तुकाराम जाधव यांना अटक केली असून चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नांदेडमधील एटीएसच्या पथकाने चार जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून, त्यात लातूरच्या दोन शिक्षकांचा समावेश आहे. संजय तुकाराम जाधव व जलील खान उमर खान पठाण हे दोघेही लातूरचे शिक्षक आहेत. इरण्णा मशनजी कोंकळवाव व गंगाधर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पैशाच्या मोबदल्यात ‘नीट’च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करत असल्याचे अवैध रॅकेट चालवत असल्याची टीप ‘एटीएस’ अधिकाऱ्यांना मिळाली, असे लातूर पोलीस अधीक्षकांनी सांगितले. गेल्या शनिवारी जाधव व पठाण यांना एटीएसने लातूरहून ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नीट २०२४’च्या परीक्षेबाबतची माहिती एका ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या मोबाईल फोनवर आढळली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

‘नीट’ ची आणखी पाच प्रकरणे सीबीआयकडे

‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकाराबाबत आणखी पाच प्रकरणे सीबीआयने तपासासाठी घेतली आहेत. या प्रकरणांचा तपास गुजरात, राजस्थान व बिहार पोलिसांकडे होता. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुजरात, बिहार व राजस्थानमध्ये यापूर्वी गुन्हे दाखल झाले होते. आता सीबीआयने पुन्हा गुन्हे दाखल केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in