
मुंबई : रोज वाढणाऱ्या ऑनलाइन - ऑफलाइन अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक आपले जगणेच हरवून बसल्याची खंत शिक्षक नेते मुंबई मराठी अध्यापक संघांचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी व्यक्त केली.
मुंबई, ठाणे जिल्ह्यातील २२ शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच विविध ठिकाणी झाला. यावेळी बोरनारे यांनी ही खंत बोलून दाखवली. १ जून जन्मतारीख असलेल्या अनेक शाळांमधील शिक्षक सेवानिवृत्त झाले.
दैनंदिन अध्यापन करीत असताना शिक्षक आपल्या विषयाबाबत सजग राहून अनेक संदर्भ तसेच अवांतर पुस्तक वाचून चिंतन करीत असत. याचा फायदा प्रभावी अध्यापनासाठी होत असे. परंतु आता वाढत्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना वेळच मिळत नसून अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकाचा कारकून झाला असल्याची खंत व्यक्त करून शिक्षकांचे अशैक्षणिक कामे बंद करावीत, अशीही मागणी अनिल बोरनारे यांनी केली.
अशा आशयाचे संदेश शाळांच्या ग्रुपवर शिक्षण विभागाकडून टाकून विविध माहिती मागितली जाते. यातच शिक्षकांचा वेळ जातो. निवडणुकीचे काम, दशवार्षिक जनगणना व आपत्कालीन व्यवस्थापनाची कामे वगळता शिक्षकांना अन्य कामे देऊ नये असे ‘राइट टू एज्युकेशन’ कायद्यात असतानाही या कायद्याची पायमल्ली होत असल्याचाही आरोप बोरनारे यांनी केला. मेची सुट्टी जाहीर होताच ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांना कामाला जुंपले असल्याबद्दलही बोरणारे यांनी नाराजी व्यक्त केली.