विधान परिषदेत पोस्टर वॉर! वर्ल्ड कप विजेत्यांवरून राजकारण; "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो, खेळाडूंचे का नाही?"

भारतीय टीमचे स्वागत झालेच पाहिजे; मात्र विधान भवनात सत्कारमूर्ती खेळाडूंचा फोटो न लावता मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री झळकत आहेत. एखादी मॅच जिंकल्याप्रमाणे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो झळकतायत, असा प्रश्न...
विधान परिषदेत पोस्टर वॉर! वर्ल्ड कप विजेत्यांवरून राजकारण; "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो, खेळाडूंचे का नाही?"

मुंबई: १७ वर्षांनंतर भारतात टी-२० वर्ल्ड कप आणल्याबद्दल संपूर्ण जगात भारतीय टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय टीमचे स्वागत झालेच पाहिजे; मात्र विधान भवनात सत्कारमूर्ती खेळाडूंचा फोटो न लावता मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री झळकत आहेत. एखादी मॅच जिंकल्याप्रमाणे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो झळकतायत, असा प्रश्न विधान परिषदेचे सदस्य भाई जगताप यांनी शुक्रवारी उपस्थित केला. भाई जगताप यांच्या प्रश्नावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने उभे ठाकले. जगभरात भारतीय टीमचे अभिनंदन होत असताना खेळाडुंच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत पडसाद उमटले हे जनतेला कळाले, तर चुकीचा मेसेज जाईल. खेळाडुंची वेळ मिळणे गरजेचे होते, त्यामुळे बहुतेक सत्कार समारंभाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले नसेल, परंतु आपण सगळे कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे निमंत्रण उपसभापती निलम गोऱ्हे यांनी परिषदेच्या सदस्यांना दिले.

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनीही भाई जगताप यांच्या मुद्द्याला दुजोरा दिला. भारताने विश्वचषक जिंकला ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच आपल्या विधिमंडळाने टीम इंडियाचा सत्कार समारंभ पार पडणार ही देखील अभिमानाची गोष्ट आहे. मात्र विरोधकही या सभागृहाचे सदस्य आहेत. त्यांनाही या समारंभात सहभागी करून घ्या. आम्हाला या सत्कारापासून दूर का ठेवले जाते? आम्ही भारताचे नागरिक आहोत. जो कार्यक्रम सरकारने आयोजित केला आहे तो विधिमंडळाला माहीत असला पाहिजे, इतकीच आमची मागणी आहे, असे परब म्हणाले.

भाई जगताप आणि अनिल परब यांचा मुद्दा रास्त आहे. सत्कार सोहळ्याचे निमंत्रण सर्वपक्षीय नेत्यांना दिले पाहिजे. आता मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेला पोस्टर दाखवत आहात. तिथे कुणाचा फोटो असायला हवा होता, असे तुम्हाला वाटते. देश जगज्जेता झाल्यानंतर सरकारने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याला काय शंभर फोटो लागणार का, असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in