
सांगली : जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चिंचोली या गावातील जाधव नामक व्यक्तीच्या घरातील गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत, असा दावा करण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू असल्याने चमत्काराचा दावा करणे हा जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे, तेव्हा असा खोटा दावा करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, प्रा. एस.के. माने यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.
अंनिसने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सध्याच्या विज्ञान युगात असे चमत्कार घडू शकत नाहीत. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असते, ते कारण मानवी बुद्धीला समजते. अंनिसने आपल्या प्रसिद्धी पत्रकात असे आवाहन केले आहे की, जाधव यांनी चमत्कार तपासणी करण्याची परवानगी दिली तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या चमत्कारामागील कारण - विज्ञान लोकांना सांगू शकेल. जाधव यांना अंनिसचे आवाहन आहे की, कृपया चमत्काराची सत्यता पडताळण्यासाठी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीस सहकार्य करावे.
अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, ‘‘गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा आहे. या कायद्याच्या कलम दोन नुसार एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून, त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे; आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसवणे, ठकवणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे, हा दखलपात्र गुन्हा आहे. या जादूटोणाविरोधी कायद्यानुसार त्या भागातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे या कायद्याचे 'दक्षता अधिकारी' म्हणून काम करत असतात. या दक्षता अधिकाऱ्यांनी संबंधित चमत्काराची सत्यता पडताळून पहावी, तथाकथित चमत्कार घडवून दिशाभूल केली असल्यास संबंधितावर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही करत आहोत.’’