मुंबई : नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पुढच्याच दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला. महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधीच दहिसर वॉर्ड क्रमांक-१ मधील माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. निवडणुकीच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
दादर येथील ‘वसंत स्मृती’ येथे सकाळी १०.५० वाजता मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला, यावेळी भाजप आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. ठाकरे घराण्याचा विश्वासू समजला जाणारा घोसाळकर परिवार काही धक्क्यांमुळे अडचणीत आला होता. माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र तथा माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नरोन्हाने गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर तेजस्वी यांनी याआधीही शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन-तीन महिन्यांपूर्वी त्यांची समजूतही काढली होती. मात्र, प्रभाग रचनेत त्यांचा मतदारसंघ राखीव आल्याने तेजस्वी यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, निवडणुकीच्या काही दिवसआधी तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे दहिसर मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे.
“शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडणे खूप कठीण आहे. ज्यांनी ओळख दिली, त्यांची साथ सोडणे खूप कठीण आहे. मात्र, विभागातील विकासकामे करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. एक पक्ष सोडताना किंवा परिवार सोडताना ज्यांनी मला ओळख दिली, त्यांना सोडताना खूप दुःख होत आहे,” असे तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितले.
सुनेचे कान धरता येत नाहीत - विनोद घोसाळकर
तेजस्वी आज भाजपमध्ये गेली, पण मी आजही शिवसेना ठाकरे पक्षातच आहे. तिने काय केले, याबाबत मी बोलू शकत नाही. पण तिचे निर्णय घेण्याचा अधिकार तिला आहे. आज अभिषेक असता, तर हा प्रश्नच आला नसता. अभिषेक आणि माझी सून यांच्यात फरक आहेच. काल संध्याकाळी घरच्यांसमोर तिने आपला निर्णय कळवल्यानंतर पक्षप्रमुखांना मी याबाबतची तत्काळ माहिती दिली होती. आपण मुलाचे कान कधीही धरू शकतो, पण सूनबाईचे धरू शकत नाही, असे सांगताना माजी आमदार विनोद घोसाळकर यांना अश्रू अनावर झाले.
याआधीही भाजप प्रवेशाची चर्चा
तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व असलेल्या मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचवेळी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली होती.