राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वयाच्या मुद्यावर बोलल्याने टीकेचे धनी झाले होते. आता त्यांच्या आणखी एका विधानावरुन राजकारण तापले आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी "चुलत्याच्या मरणाची वाट पाहतोय, अजित पवारांनी हद्द केली, लाज वाटते तुमच्यासोबत काम केल्याची", असे म्हणत अजित पवारांवर हल्लाबोल केला. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आव्हाडांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीका केली आहे.
"राज्यात द्वेष पसरवून समाधान झालं नसावं म्हणून जितेंद्र आव्हाड पवार कुटुंबात टेंभा घेऊन आग लावण्याचे काम करत आहेत.अजितदादा यांच्या बोलण्याचा मतितार्थ वेगळा काढून लोकांची दिशाभूल करू नका.लोकं हुशार आहेत त्यांना दुधात मिठाचा खडा टाकणारे आव्हाड सहज कळतात. त्यामुळे तेलघाले आव्हाड तुम्ही आता गप्पच बसा!", असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. त्यांनी त्यांच्या 'एक्स'अकाऊंटवर याबाबतची पोस्ट केली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
"शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल', कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत...?", असे म्हणत बारामतीत अजित पवारांनी भावनिक आवाहनाला बळी न पडण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा खपपूस समाचार घेतला.
काकाच्या मरणाची वाट बघतोय-
एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणे कितपत योग्य आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतोय. शरद पवार अजरामर राहतील, त्यांचे योगदान अजरामर राहतील. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली. भावनिक आवाहन तुम्ही करता येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील, असे आव्हाड म्हणाले होते.
लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची-
"आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग हे देखील नाव काढतात. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसले जाईल याची आज तुम्ही वाट बघता. असल घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी बघितले नाही", असेही आव्हाड यांनी म्हटले.