मराठा आरक्षणासंदर्भात काय केलं ते 17 डिसेंबरपर्यंत सांगा, अन्यथा...; जरांगे पाटलांचा सरकारला नवा अल्टीमेटम

येणाऱ्या 17 डिसेंबरला महाराष्ट्रातील मराठा समाजाची अंतरवाली सराटीत बैठक बोलवण्यात आली आहे
मराठा आरक्षणासंदर्भात काय केलं ते 17 डिसेंबरपर्यंत सांगा, अन्यथा...; जरांगे पाटलांचा सरकारला नवा अल्टीमेटम

मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण छेडल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत देत आपलं आमरण उपोषण मागे घेतलं. याशिवाय आरक्षणाचा मुद्दा विस्मरणात जाऊ नये म्हणून आणि मराठा समाज एकजूट व्हावा यासाठी त्यांनी राज्यभराचा दौरा करत मोठमोठ्या सभा घेतल्या. असं असताना आता मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबद्दल आतापर्यंत जे निर्णय घेतले ते 17 डिसेंबरपर्यंत सांगा, असा अल्टिमेटम त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

येणाऱ्या 17 डिसेंबरला महाराष्ट्रातील मराठा समाजाची अंतरवाली सराटीत बैठक बोलवण्यात आली आहे. जर 24 डिसेंबरपर्यंत राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, तर पुढील दिशा काय? त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती जरांगे-पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली . मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी बोलू नये, त्यांनी खुशाल झोपावं, त्यांनी संरक्षण घ्यावं, असं म्हणत त्यांनी नाव न घेता भुजबळांवर निशाणा साधला.

काय म्हणाले जरांगे?

"17 डिसेंबरला अंतरवली सराटीत सकाळी 9 वाजता ही बैठक होणार आहे. 12 वाजेपर्यंत सर्वांचा परिचय होईल. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर आंदोलनाची पुढील दिशा काय? त्यावर 12 ते 3 अशी चर्चा होईल", असं जरांगे यांनी सांगितलं. मराठ्यांचे आरक्षण ओबीसी आरक्षणात 50 टक्केच्या आत सापडले आहे. मग आम्हाला हेच आरक्षण द्या, यावर ठाम असल्याचंही ते यावेळी म्हणाले. आजच नाही पण आम्ही पहिल्यापासून सांगतो, क्युरीटी पीटिशन का दाखल करत आहात? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, 17 तारखेला होणाऱ्या बैठकीच्या आमंत्रणाची वाट पाहू नका, सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीमध्ये या, असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in