मराठा तरुणाच्या आत्महत्येमुळे धाराशिवमध्ये तणाव

मृतदेह घेऊन ते तरुणाच्या गावी माडजला अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले
मराठा तरुणाच्या आत्महत्येमुळे धाराशिवमध्ये तणाव

उमरगा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून धाराशिव जिल्ह्यातील माडज (ता. उमरगा) येथील किसन माने (३०) या तरुणाने जलसमाधी घेतली. बुधवारी सायंकाळी गावातील शिवकालीन वैजनाथ महाराज तलावात उडी मारत स्वत:चे जीवन संपवले. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा मृतदेह तहसील कार्यायलयासमोर ठेवण्यात आला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला.

या घटनेची माहिती पसरताच तालुक्यात तणाव पसरला. अन्य गावांतील लोक माडज गावात जमल्याने पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली. त्या तरुणाचा मृतदेह घेऊन आंदोलक तहसील परिसरात मोठ्या संख्येने जमले. यावेळी आंदोलकांनी एक कार पेटवून दिली. त्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली. चर्चेअंती आंदोलकांना शांत करण्यात प्रशासनाला यश आले. त्यानंतर मृतदेह घेऊन ते तरुणाच्या गावी माडजला अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले.

सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

माडज गावच्या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, 'माडज, जि. धाराशिव येथे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या किसन चंद्रकांत माने या तरुणाने आत्महत्या केली. ही अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. हे सरकार अंतरवली येथील मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्यानंतर तरुणवर्गात तसेच मराठा समाजात उसळलेल्या असंतोषाला योग्य पद्धतीने हाताळण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. या तरुणाच्या बलिदानास केवळ हे शासन जबाबदार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in