राष्ट्रवादी-शिवसेनेत धुसफूस सुरूच; शिवसेना मंत्री, आमदारांची रायगड जिल्ह्याच्या ‘डीपीडीसी’ बैठकीला अनुपस्थिती

रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सुरू असलेली धुसफूस अद्यापही कायम असून या वादाचा नवा अंक मंगळवारी पाहायला मिळाला.
राष्ट्रवादी-शिवसेनेत धुसफूस सुरूच; शिवसेना मंत्री, आमदारांची रायगड जिल्ह्याच्या ‘डीपीडीसी’ बैठकीला अनुपस्थिती
(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सुरू असलेली धुसफूस अद्यापही कायम असून या वादाचा नवा अंक मंगळवारी पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी रायगडच्या जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) वार्षिक बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला आम्हाला निमंत्रित करण्यात आले नसल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी व महेंद्र थोरवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत आता अजित पवारांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांना सद्य:स्थितीत पालकमंत्री नाहीत. त्यामुळे सदर जिल्ह्यांतील केवळ मंत्र्यांनाच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. रायगडमधून मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, भरत गोगावले बैठकीसाठी हजर राहिले नाहीत, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, नाशिकच्या जिल्हा नियोजन समितीचीही बैठक होणार असून या बैठकीसाठी त्या जिल्ह्यातील मंत्री दादा भुसे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांच्यासह गिरीश महाजन यांना निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहितीही अजित पवारांच्या कार्यालयाने दिली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला न बोलावल्याने शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. या बैठकीचे आम्हाला निमंत्रण नव्हते. अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. आदिती तटकरे त्या बैठकीला उपस्थित होत्या. पण, आमच्या तिन्ही आमदारांना दूरान्वयानेही कल्पना देण्यात आली नाही, निरोप पण आला नाही. यासंदर्भात मी ‘डीपीओ’कडून माहिती घेतली. ते बैठकीला उपस्थित होते. जिल्हाधिकारी व्हर्च्युअली उपस्थित होते. जिल्ह्यातील आमच्या कोणत्याही आमदाराला कोणतीही सूचना नव्हती, असे दळवी म्हणाले.

खरेतर ही बैठक अधिकृत की अनधिकृत आम्हाला माहिती नाही. पण, यासंदर्भात आमचे नेते एकनाथ शिंदेंसोबत आम्ही निश्चितपणे चर्चा करणार आहोत. आमच्यावर वारंवार होणाऱ्या अन्यायाबद्दल न्याय मिळाला पाहिजे. रायगडमध्ये पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. आमची आग्रही मागणी आहे की, भरत गोगावले पालकमंत्री व्हायला हवेत, असे दळवी म्हणाले.

शिवसेना आमदारांना का डावलले जातेय - थोरवे

दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांना का डावलले जात आहे, असा सवाल शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. थोरवे या बैठकीबद्दल म्हणाले की, आज रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक मंत्रालयात घेण्यात आली. या बैठकीसंदर्भात आमदारांना कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. जिल्हाधिकारी ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहतात, मग आमदार, लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलावण्यात आले नाही, असा सवाल त्यांनी केला.

माझ्या मते रायगड जिल्ह्यात जे काही आता राजकारण सुरू आहे. हे जाणीवपूर्वक असून शिवसेनेच्या आमदारांना हेतूपूरस्सर डावलले जात आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हा नियोजन समिती बैठकीला फक्त मंत्री असत नाही, आमदार-खासदार सगळे उपस्थित असतात. पण, जाणीवपूर्वक आम्हाला त्याठिकाणी बोलवण्यात आले नाही. याचे कारण आम्हाला समजले नाही, असे म्हणत महेंद्र थोरवे यांनी बैठकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आम्हाला यासंदर्भात माहिती देण्याची जिल्हाधिकाऱ्यांचीही जबाबदारी होती. परंतु अजित पवारांच्या दालनात ती बैठक घेण्यात आली. त्या बैठकीला आमदारांना डावलण्यात आले. आमदारांना माहिती दिली गेली नाही. आम्हीसुद्धा लोकप्रतिनिधी आहोत. आमच्या मतदारसंघातही प्रश्न आहेत. हे प्रश्न आम्हाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सोडवायचे असतात. मग जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला बैठकीला बोलवायला हवे होते, अशा शब्दात थोरवे यांनी नाराजी व्यक्त केली.

पालकमंत्रिपदाचा तिढा कायम

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री भरत गोगावले यांनी सुरुवातीपासून रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदासाठी इच्छा व्यक्त केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी देताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली. मात्र, रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही कायम आहे.

logo
marathi.freepressjournal.in