MHT CET Counselling 2024 : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या तारखा जाहीर; १० जुलैपासून अभियांत्रिकी प्रवेशाला होणार प्रारंभ

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतरही प्रवेश प्रक्रिया सुरू होत नसल्याने विद्यार्थी आणि पालक चिंतेत होते. अखेर..
MHT CET Counselling 2024 : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या तारखा जाहीर; १० जुलैपासून अभियांत्रिकी प्रवेशाला होणार प्रारंभ

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतरही प्रवेश प्रक्रिया सुरू होत नसल्याने विद्यार्थी आणि पालक चिंतेत होते. अखेर सीईटी सेलने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या तारखा सीईटी सेलने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार अभियांत्रिकीच्या पदवी बीई/बी.टेक चे प्रवेश १० जुलैपासून होणार आहेत, तर बी.फार्मसी/ फार्म डी चे प्रवेश ११ जुलैपासून सुरू होतील.

सीईटी सेलने घेतलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विविध १९ परीक्षांना तब्बल ११ लाख ३३ हजार विद्यार्थी बसले होते. परीक्षांचे निकाल जाहीर होऊन पंधरा दिवसांहून अधिक दिवस उलटल्यानंतरही प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नव्हते. यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत होते. प्रवेशाचे वेळापत्रक तातडीने जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडूनही करण्यात येत होती. अखेर सीईटी सेलने उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत.

संभाव्य प्रवेश प्रक्रियेच्या तारखा

तंत्रशिक्षण विभाग

एमसीए - ६ जुलै

एमबीए/एमएमएस - ९ जुलै

एमई/एम.टेक- ९ जुलै

एम.आर्क- ९ जुलै

बीई/बी.टेक - १० जुलै

बी.फार्मसी/ फार्म डी - ११ जुलै

बी.एचएमसीटी- ११ जुलै

बी.डिझाइन -१२ जुलै

एम.फार्म- १३ जुलै

एम.एचएमसीटी- १३ जुलै

थेट द्वितीय वर्ष इंजिनियरिंग (डीएसई)- १६ जुलै

थेट द्वितीय वर्ष फार्मसी (डीएसपी)- १६ जुलै

उच्च शिक्षण विभाग

एलएलबी ५ वर्ष- ८ जुलै

बीए/बीएससी-बी.एड- ८ जुलै

बी.एड-एम.एड -८ जुलै

एलएलबी ३ वर्ष- १० जुलै

बी.पी. एड -११ जुलै

एम.पी. एड- ११ जुलै

बी.एड -१२ जुलै

एम.एड- १२ जुलै

logo
marathi.freepressjournal.in