राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ येथे भीषण अपघात

ट्रॉलीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव नजीकच्या भादोले येथील दिंडी सोहळ्यासाठी चाललेले वारकरी होते
राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ येथे भीषण अपघात

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ (ता.खंडाळा) येथे भरधाव आयशर टेम्पो आणि ट्रॅक्टर ट्रॉली यांच्यात भीषण अपघात होवून १ वारकरी ठार, तर ३० जण गंभीर जखमी झाले. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव नजीकच्या भादोले येथील दिंडी सोहळ्यासाठी चाललेले वारकरी होते. धडक इतकी भीषण होती की टॉलीतील वारकरी हवेत फेकले गेले. मयाप्पा कोंडिबा माने (४५) असे मृताचे नाव आहे तर मारुती भैरवनाथ कोळी (४०) हे गंभीर जखमी आहेत.ही घटना सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले, लाहोटे येथील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रेश्वर भाविक मंडळाची दिंडी क्र.१ व ७ रविवारी रात्री आळंदी ते पंढरपूर असा पायी दिंडी सोहळ्याकरीता आळंदी येथे जात होते. त्यांच्या ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडलेल्या होत्या. यामध्ये महिलांसह ४३ वारकरी होते. दरम्यान ट्रॅक्टर, ट्रॉली सातारा ते पुणे महामार्गावर शिरवळ येथे आली असता पाठीमागून तरकारी घेऊन पुणेकडे भरधाव वेगात निघालेल्या आयशर टेंपो चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पोने या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर टेम्पो महामार्गावर पलटी झाला. ट्रॅक्टर ट्रॉलीमधील वारकरी हे महामार्गावर हवेत उडत खाली पडल्याने गंभीर जखमी झाले, तर ट्रॉलीचा चक्काचूर झाला. यावेळी ट्रॉलीमधील लोखंडी बार मायप्पा माने व मारुती कोळी यांच्या पोटामध्ये घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. यात मयाप्पा माने यांचा मृत्यू झाला. तर मारुती भैरवनाथ कोळी गंभीर जखमी झाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in