

मुंबई : राज्यात पुढील वर्षापासून शिक्षक पात्रता परीक्षेसह (टीईटी) अन्य सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील. या परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडाव्यात म्हणून आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.
टीईटी परीक्षा पेपर फुटीप्रकरणी जे कुणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २८ जूनला टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, परीक्षेच्या आधीच पेपर फुटल्याने परिषदेवर परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली. या पेपर फुटीचे पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. विरोधी पक्षाने स्थगन प्रस्ताव मांडून पेपर फुटीवर चर्चेची मागणी केली. तर विधानपरिषदेतही विरोधकांनी गदारोळ केल्याने कामकाज तहकूब करावे लागले.
विधानसभेमध्ये अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळत याप्रकरणी निवेदन करण्याचे निर्देश सरकारला दिले. त्यानुसार भुसे यांनी आज विधानसभेत निवेदन केले. पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग देण्यात आला असून या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपविण्यात आला आहे. याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देतानाच भुसे यांनी राज्य सरकारने टीईटीची फेरपरीक्षा विनाशुल्क घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. पोलिसांना २७ जून रोजी टीईटीची प्रश्नपत्रिका विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी सापळा रचून प्रश्नपत्रिका विक्रीस आणणाऱ्या तिघांना अटक केली असून, या प्रकरणाचा तपास बिहार, हरियाणा आणि दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या ताब्यातून २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली.
शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर जप्त करण्यात आलेली प्रश्नपत्रिका ही नियोजित परीक्षेचीच असल्याची खात्री झाली. त्यानंतर राजीव श्रीप्रयाग शाव आणि अन्य दोघांविरुद्ध कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत, असे भुसे यांनी सांगितले. पेपर फुटीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस सहआयुक्त (गुन्हे) ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तपासासाठी दोन पथके बिहारला, एक हरियाणाला आणि एक दिल्लीला रवाना करण्यात आले असून या रॅकेटचे राष्ट्रीय स्तरावरील धागेदोरे शोधण्याचे काम सुरु असल्याची माहिती भुसे यांनी दिली.
विधानसभेत सभात्याग
दरम्यान, आज विधानसभेचे कामकाज सुरु होताच शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनी पेपरफुटीसंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न करून चर्चेची मागणी केली. या मागणीला काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी समर्थन देत तातडीने विशेष चर्चा घ्यावी आणि सरकारने या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी लावून धरली. अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्याने संतप्त विरोधकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला व पायऱ्यांवर निदर्शने केली.
परिषदेतही गोंधळ, सभागृह तहकूब
विधान परिषदेत विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र सभापतींनी ही मागणी फेटाळून लावल्याने विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालत घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभापती राम शिंदे यांनी अखेर सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले. विरोधकांनी २८९ अंतर्गत चर्चेची मागणी केली होती. परीक्षांचे पेपर फोडण्याचे हे मोठे रॅकेट आहे. शिक्षण विभागामार्फत ही परीक्षा होते आणि याला शिक्षण मंत्री पूर्णतः जबाबदार असून त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल दानवे यांनी केला.तर काँग्रेसचे सतेज पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय एखादी परीक्षा घेणे बंधनकारक करते तेव्हा ती परीक्षा व्यवस्थित घेणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. तेरा कोटी जनतेचे भले करण्याच्या आणाभाका घेणारे हे सरकार सहा लाख विद्यार्थ्यांची साधी परीक्षा घेऊ शकत नसेल तर त्याला काय म्हणावे? पुणे महापालिकेत पेपर फुटला. विद्यापीठातही पेपर फुटला. नीटपासून सीबीएसपर्यंत पेपर फोडण्यात कोणाचे लागेबांधे आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.