प्रतिनिधी/मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप मंगळवारी पूर्णपणे जाहीर झाले. शिवसेना ठाकरे गट २१, काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट १० जागा असा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे. यात उद्धव ठाकरे यांनीच बाजी मारली असून ठाकरे गटाला २१ जागा मिळविण्यात ते यशस्वी ठरले आहेत. यामुळे आता आघाडीत ठाकरे गटच मोठा भाऊ असणार, हे अधोरेखित झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना दुभंगली. मोठ्या प्रमाणात खासदारही शिंदेंसोबत गेले. त्यामुळे जागावाटपात ठाकरे गटाला किती जागा मिळणार, याकडे लक्ष होते. मिलिंद देवरा आणि संजय निरूपम यांनी जागावाटपात शिवसेनेत झालेले बंड आणि त्यानंतर ठाकरे गटाची कमी झालेली ताकद, या गोष्टी लक्षात घ्या, असे पक्षनेतृत्वाला सुचविले होते. उद्धव ठाकरे यांनी वंचितलादेखील सोबत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी ठरला नाही. प्रकाश आंबेडकर यांनी वेगळी वाट चोखाळली. त्यामुळे ठाकरे गटाला किती जागा मिळणार याचे औत्सुक्य होते. मात्र ठाकरे गटाला आता २१ जागा मिळाल्या आहेत.
आघाडीत ठाकरे गटाला सर्वात जास्त म्हणजे २१ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसकडून सांगलीची जागादेखील त्यांनी खेचून घेतली आहे. काँग्रेसला १७ जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानेही बाजी मारली असून दोन आकडी म्हणजे १० जागा आपल्याकडे खेचून घेतल्या आहेत.