सुषमा अंधारेंच, बावनकुळेंना आव्हान ; ४८ तासांत मातोश्रीत या… आ देखे जरा किसमे कितना है दम

भाऊ, तुमच्यात एवढी ताकद, एवढी क्षमता आणि एवढी हिंमत असेल तर मग त्याच फडणवीसांनी तुमचं तिकीट का कापलं?
सुषमा अंधारेंच, बावनकुळेंना आव्हान ; ४८ तासांत मातोश्रीत या… आ देखे जरा किसमे कितना है दम

ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी काल हल्ला केला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतली. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. 

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरेंना इशारा दिला. उद्धव ठाकरे यांनी आतापासून अशा भाषेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यास त्यांना मातोश्री बाहेर पडू देणार नाही, असे बावनकुळे म्हणाले. बावनकुळे यांच्या वक्तव्याची ठाकरे गटनेत्या सुषमा अंधारे यांनी दखल घेतली आहे. हिंमत असेल तर येत्या ४८ तासांत मातोश्रीवर येऊन दाखवा, असे खुले आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले. त्या ठाण्यात रोशनी शिंदे यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात त्या बोलत होत्या. यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, "आम्ही उद्धव ठाकरेंना मातोश्रीबाहेर पडू देणार नाही, असे बावनकुळे काल म्हणाले. पण बावनकुळे साहेब, तुम्ही ज्या तळमळीने बोललात... याचा अर्थ महाराष्ट्र भाजप तुमचे ऐकते. मग मला चंद्रशेखरदादांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे, भाऊ, तुमच्यात एवढी ताकद, एवढी क्षमता आणि एवढी हिंमत असेल तर मग त्याच फडणवीसांनी तुमचं तिकीट का कापलं?” 

बावनकुळे यांना स्वतःची उमेदवारी वाचवता आली नाही. तरीही उद्धव ठाकरेंना मातोश्रीबाहेर पडू देणार नाही, असे ते म्हणतील. आम्ही चांगले लोक आहोत. आम्ही सज्जन आहोत. आमच्या कुटुंबाने आमच्यावर चांगले संस्कार केले आहेत. तर बावनकुळे साहेब, मी तुम्हाला हात जोडून आमंत्रण देते, हिम्मत असेल तर ४८ तासांत मातोश्रीवर या... आ देखे जरा किसीमे कितना है दम...' अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी हल्लाबोल केला.

logo
marathi.freepressjournal.in