हुकूमशाही संपवण्यासाठी एकत्र आलोय - उद्धव ठाकरे

माझ्या देशातील जनता घाबरणारी नाही तर लढणारी आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या बॅनरवर लिहा की, ‘ईडी, सीबीआय, आयटी डिपार्टमेंट’ हे भाजपचे तीन सहकारी पक्ष आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना तुरुंगात टाकले. हेमंत सोरेन यांच्यावर आरोप करत त्यांना तुरुंगात टाकले, हा काय प्रकार आहे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
हुकूमशाही संपवण्यासाठी एकत्र आलोय - उद्धव ठाकरे

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील रामलीला मैदानातील सभेत भाजपवर जोरदार तोफ डागली आहे. ‘निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली. मात्र, भाजपमध्ये गेलेल्या ठगांवरील केसेस मागे घेत त्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुवून काढले. आम्ही निवडणूक प्रचारासाठी एकवटलो नसून लोकशाहीच्या रक्षणासाठी, हुकूमशाही संपवण्यासाठी एकत्र आलोय, असे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दिल्लीत विरोधी पक्षांतर्फे ‘लोकशाही बचाव’ महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सगळे विरोधक रविवारी दिल्लीत एकवटले होते. या रॅलीला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या देशातील जनता घाबरणारी नाही तर लढणारी आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या बॅनरवर लिहा की, ‘ईडी, सीबीआय, आयटी डिपार्टमेंट’ हे भाजपचे तीन सहकारी पक्ष आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना तुरुंगात टाकले. हेमंत सोरेन यांच्यावर आरोप करत त्यांना तुरुंगात टाकले, हा काय प्रकार आहे? असा सवाल त्यांनी केला.

हे सरकार पाडण्याची वेळ आलीय

ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना पक्षात घेत त्यांच्यावरचे आरोप पुसून टाकले. या भ्रष्ट लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? किती दिवस आपण हे सहन करायचे, आता त्यांचे ४०० पारचे स्वप्न आहे. एक व्यक्ती आणि एका पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक आहे. आता ही व्यक्ती आणि या पक्षाचे सरकार पाडण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

मजबूत देशासाठी आपल्याला एकजुटीचे सरकार आणावे लागेल. देशातील प्रांत-राज्याचा सन्मान करणारे सरकार आणले तरच देश वाचेल. तुमचे भविष्य कुणाच्या हातात द्यायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे, असे ठाकरे म्हणाले.

ठाकरे-फडणवीस यांच्यात सावरकरांवरून वॉर

‘सावरकर’ चित्रपटावरून उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भडका उडाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण राहुल गांधी यांनी ‘सावरकर’ चित्रपट पाहावा म्हणून अख्खे थिएटर माझ्या पैशाने बुक करायला तयार असल्याचा टोला लगावला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी आधी मणिपूर आणि लडाखला जाऊन यावे. तेथील परिस्थिती पाहावी. अरुणाचल प्रदेश आणि दार्जिलिंगला जावे. निर्वासित काश्मिरी पंडितांना भेटावे. ‘बॉयकॉट बॉलिवूड’ म्हणणारे बॉलिवूडच्या नादी लागलेत. त्यामुळे एखाद्या प्रोड्युसरला घेऊन त्यांनी ‘मणिपूर फाइल्स’ चित्रपट काढावा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी, जसजशा निवडणुका जवळ येतील आणि निकाल समजतील तेव्हा अजून काय-काय उद्धव ठाकरे बोलतील. त्यांची मजल कुठपर्यंत जाईल हे सांगता येणार नाही. महाराष्ट्रात तुम्ही फार तर एखाद‌्दुसरी जागा निवडून येते का ते बघा. तुम्ही एवढ्या मोठ्या चार-पाच जणांच्या पक्षाचे प्रमुख आहात, पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in