अध्यक्षांनी पाठवलेल्या अपात्रतेसंदर्भातील नोटीसला ठाकरे गटाने दाखवली केराची टोपली ; कारवाई होण्याची शक्यता
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या तसंच ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्रतेसंदर्भातील कारवाई नोटीस बजावली होती. या नोटशीला दोन्ही गटाच्या आमदारांना १७ जुलै सोमवारपर्यंत उत्तर देण्याची मुदत देण्यात आली होती. आज विधासभा अध्यक्षांनी दिलेली मुदत संपली आहे. शिंदे गटाच्या आमदारांकडून अध्यक्षांनी पाठवलेल्या नोटीशीला उत्तर देण्यात आलं आहे. मात्र, ठाकरे गटाने या नोटीशीला केराची टोपली दाखवली आहे. ठाकरे गटाकडून या नोटीशीला कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनानंतर ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई होऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार विधिमंडळाच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील नोटीशीला उत्तर देण्याची मुदत आज संपली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या ४० आमदारांकडून विधिमंडळाच्या नोटशीला उत्तर देण्यात आलं आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या एकाही आमदाराने या नोटीशीला उत्तर दिलेलं नाही. ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाठवलेल्या नोटीशीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
नोटीशीला उत्तर न दिल्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांनी विधानसभा अध्यक्ष सुनावणीसाठी बोलावणार असल्याचं सांगितलं जात आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांना सुनावणीसाठी बोलावलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.