ठाकरेंना लागतात कंटेनर! महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात

पंतप्रधान मोदी यांचा एकदा आणि महाराष्ट्रातील जनतेचा एकदा असा दोनदा विश्वासघात उद्धव ठाकरेंनी केल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
ठाकरेंना लागतात कंटेनर! महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात

राजा माने/कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वास्तव्य असताना ‘मातोश्री’ हे पवित्र मंदिर होते, आता ती उदास हवेली झाली आहे. आमच्यावर खोक्यांचा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंना खोके नव्हे, तर कंटेनर लागतात, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे शिवसेना महामेळाव्यात केला. उद्धव ठाकरेंच्या निरागस चेहऱ्यामागे अनेक चेहरे दडले आहेत. पंतप्रधान मोदी यांचा एकदा आणि महाराष्ट्रातील जनतेचा एकदा असा दोनदा विश्वासघात उद्धव ठाकरेंनी केल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्यांनी प्रथम आरशात बघावे. बाळासाहेबांचा वारसा सांगण्यासाठी आधी मनगटात ताकद असावी लागते. आम्ही ती मेहनत केली आहे. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी माझ्यासोबत आहेत. त्यासाठी माझा आवाज कुणीही बंद करू शकत नाही. जर आमच्यासाठी खड्डे खोदाल तर तुम्हीच खड्ड्यात जाल,” असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दिला.

कोल्हापूर येथे शिवसेनेचे दोन दिवसीय महाअधिवेशन पार पडले. शनिवारी अखेरच्या दिवशी समारोपप्रसंगीच्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे हे कुण्या एकाचे नव्हते, तर ते सर्व शिवसैनिकांचे दैवत होते. उद्धव ठाकरे यांना २००४ पासूनच पक्षप्रमुखपदाचा मोह होता. २०१९ मध्ये जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करायची वेळ आली होती, तेव्हा शरद पवार यांनी मला मुख्यमंत्री व्हा, असे सांगितल्याचे ते म्हणाले. त्यावेळी यांचा चेहरा रडवेला होता. त्यावेळी मी ओळखले, यांना आता खुर्चीचा मोह झाला आहे. मी मात्र कधीच खुर्चीला हपापलेलो नव्हतो. त्यांनी मला आधीच सांगितले असते, तर मी तसे वातावरण तयार केले असते. त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका. ते निरपराध नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर अनेक चेहरे लावले आहेत.”

“महाविकास आघाडी सरकारच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडताना २०१९ मध्ये तुम्ही लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर आणि हनिमून तिसऱ्याबरोबर केलात. तुम्ही थेट शिवसैनिकांची फसवणूक केलीत. जनतेला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फसवले आहे. एका खुर्चीच्या मोहामुळे तुम्ही सर्व काही गमावले आहे. तुम्हीच सर्वांचा विश्वासघात केला. मग तुम्ही आम्हाला गद्दार कसे म्हणू शकता,” असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर उभारून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, कोट्यवधी हिंदूंचे स्वप्न साकारले. त्यामुळे शिवसेनेच्या या महाअधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव पास केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शनिवारी त्यांनी ‘जय श्रीराम’ असे म्हणत भाषणाला सुरुवात केली आणि लवकरच आम्ही अयोध्येला जाणार असल्याचे सूतोवाच केले.

शिवसेना कुणाची हे सांगण्याची गरज नाही

शिवसेनेच्या महाअधिवेशनाच्या निमित्ताने शिवसैनिक मोठ्या संख्येने येथे जमा झाले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना आपण ताकदीने उभी करत आहोत. त्यामुळेच शिवसैनिकांमध्ये उत्साह तळपत आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि धनुष्यबाणही आपल्याकडेच आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि या पक्षाच्या पाठीमागे जनतेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आता शिवसेना कुणाची, हे सांगण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय

आपण खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे काम करत आहोत. त्यामुळे आज ही शिवसेना आहे. कितीतरी आमदार, खासदार, कार्यकर्ते शिवसेनेत आले आहेत आणि अजूनही येत आहेत. महाअधिवेशनाच्या निमित्ताने कोल्हापुरात हे भगवे महावादळ आले असून, अधिवेशनामुळे शिवसैनिकांचे शक्तिपीठ येथे अवतरले आहे. एकनाथ शिंदे हा डरपोक नाही, तर निधड्या छातीचा चेला आहे. मी जिथे जातो, तिथे लोक मोठ्या संख्येने जमा होतात. हे प्रेम पैसे देऊन मिळत नाही. आम्ही हे कामातून, वागण्यातून मिळविले आहे. म्हणून आज पक्ष वाढत आहे, असेही शिंदे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in