महायुती सरकारविरोधात ठाकरे सेनेचे आज राज्यभरात जनआक्रोश आंदोलन; उद्धव ठाकरेही होणार सहभागी

महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विविध कारनाम्यांनी महाराष्ट्र देशभरात बदनाम होत असल्याचा आरोप करत राज्यातील जनतेला या सरकारच्या भ्रष्टाचाराबाबत जागृत करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे सोमवारी दुपारी १२ वाजता राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विविध कारनाम्यांनी महाराष्ट्र देशभरात बदनाम होत असल्याचा आरोप करत राज्यातील जनतेला या सरकारच्या भ्रष्टाचाराबाबत जागृत करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे सोमवारी दुपारी १२ वाजता राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईतील शिवाजी पार्क येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ या आंदोलनात सहभागी होतील.

राज्यभरात आंदोलन करताना शिवसैनिक आणि पदाधिकारी राज्य सरकारमधील समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा ६० कोटींचा घोटाळा आणि १५०० कोटींचा गैरव्यवहार, कृषीमंत्री असताना माणिकराव कोकाटे यांचे रमीचे डाव आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबद्दल बोलताना ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे वाह्यात विचारलेले प्रश्न, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे असलेला डान्सबार, राज्य सरकारमधील मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे हनी ट्रॅप प्रकरण अशा अनेक विषयांचा जाहीर पंचनामा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यस्तरावर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर तसेच मुंबईतील सर्व विभागात सोमवारी दुपारी १२ वाजता हे उग्र आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in