ठाकरे सेनेला धक्का; आमदार आमश्या पाडवी शिंदे सेनेत

नंदुरबार जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
ठाकरे सेनेला धक्का; आमदार आमश्या पाडवी शिंदे सेनेत

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या ऐन तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोबतच उद्धव ठाकरे यांना कल्याणमध्येही धक्का बसला असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत बोडारे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईत या दोघांचाही रविवारी पक्षप्रवेश झाला.

नंदुरबार हा दुर्गम जिल्हा मानला जातो. आदिवासी समाज या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. आमश्या पाडवी हे या भागातील शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते होते. २०२२ साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षातील अनेक बड्या नेत्यांची नाराजी ओढवून घेत आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीनंतरच राज्यात सत्तांतराचे नाट्य घडले होते. भाजपने नंदुरबार जागेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेससाठी सुटणार आहे. या जागेसाठी आमश्या पाडवीदेखील इच्छुक होते. मात्र, त्यांना तिकीट मिळणार नसल्याने त्यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या काँग्रेससोबत आम्ही दोन हात केले आज त्याच काँग्रेसचा प्रचार कसा करायचा हा प्रश्न आहे. तसेच नंदुरबारच्या विकासाचाही प्रश्न होता. नंदुरबारच्या विकासासाठीच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो आहोत. मंत्री दादा भुसे यांनीदेखील आपल्याला साथ दिली. विकास आणि कुपोषण प्रश्न दूर करणे यासाठी मदत व्हावी, अशी अपेक्षा यावेळी आमश्या पाडवी यांनी व्यक्त केली. दरम्यान, कल्याण शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी देखील आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत अनेक समर्थक पदाधिकारी देखील पक्षात आले आहेत. कल्याणमध्ये ठाकरे शिवसेनेला यामुळे धक्का बसला आहे.

logo
marathi.freepressjournal.in