बहुमत असूनही फडणवीस हतबल; मंत्रिमंडळात खुलेआम भ्रष्टाचार सुरू असल्याची उद्धव ठाकरेंची टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर टीका केली. मंत्रिमंडळात खुलेआम भ्रष्टाचार सुरू असूनही कोणालाही काढले जात नाही.
बहुमत असूनही फडणवीस हतबल; मंत्रिमंडळात खुलेआम भ्रष्टाचार सुरू असल्याची उद्धव ठाकरेंची टीका
Photo : X (@ShivSenaUBT_)
Published on

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर टीका केली. मंत्रिमंडळात खुलेआम भ्रष्टाचार सुरू असूनही कोणालाही काढले जात नाही.

फडणवीस पाशवी बहुमत असूनही हतबल आहेत, हे मला समजत नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अटक होते, पण ज्यांच्या खोलीत बॅगा दिसतात किंवा डान्स बार चालतात, त्यांना मंत्रिमंडळातून काढत नाहीत. अशा परिस्थितीत संस्कृती सुधारली जाऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले.

ठाकरे पुढे म्हणाले, "भाजप जे काही करते ते 'अमर प्रेम' आणि इतरांनी केले तर 'लव्ह जिहाद', हा दुटप्पीपणा का? अल्पसंख्यांकांना 'सौगात-ए-मोदी' वाटते, आम्ही काँग्रेससोबत गेलो, म्हणून हिंदुत्व सोडले, हे कसे?" ते म्हणाले की, संजय राऊत सकाळी जे बोलतात, ते जर मुख्यमंत्री ऐकतील आणि तस वागतील, तर त्यांना मदत होईल. ठाकरे यांनी स्पष्ट केले की, माझा पक्ष सत्तेत का आला हे महत्त्वाचे नाही, सत्ता आल्यानंतर काय करायचे, याचा विचार महत्त्वाचा आहे. देशासाठी आणि राज्यासाठी निर्णय घ्यावा, केवळ पक्षासाठी नाही.

ठाकरे म्हणाले की, भाजप अल्पसंख्यांकांना 'सौगात-ए-मोदी' वाटते, पण आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले असे सांगणे चुकीचे आहे. त्यांचे मत आहे की हिंदुत्व म्हणजे सुधारणा करणारे हिंदुत्व, जिथे राष्ट्रधर्म सर्वात महत्त्वाचा आहे, आणि धर्माच्या नावाने फक्त मते मागणे घातक आहे.

ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासह झालेल्या भेटीबाबतही स्पष्ट केले की, "एकत्र येणे आवश्यक नसते, पण आपण एकत्र आलो, त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. मराठी माणूस एकवटला की काय होणार, म्हणून ते आता काहीही चर्चा करीत आहेत. आम्ही २००५ पासून वेगळे झालो होतो. त्यानंतर एका मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो. आम्ही ५ जुलैला एकत्रित मेळावा घेतला; यात जर आम्हाला एकत्र यायचं नव्हतं, तर मेळावा घेतला नसता असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे राजीनामा योग्य

ठाकरे यांनी फडणवीस यांच्या राजीनाम्यावर समर्थन व्यक्त करत सांगितले की, ज्या लोकांनी मला भरभरून दिले, त्यांनीच पाठीत वार केल्यानंतर मी तिथे राहायचे नव्हते, त्यामुळे राजीनामा योग्य होता. त्यांनी पाकिस्तानी आतंकवादावरही टीका करत म्हटले की, पाकिस्तान जोपर्यंत आतंकवाद थांबवत नाही, तोपर्यंत संबंध ठेवू नका. ज्यांनी पहलगाम हल्ल्यात हिंदूंना गोळ्या घातल्या, त्यांच्याशी क्रिकेट खेळणे योग्य नाही.

भाजपचे राजकारण

मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, पीक विमा निकषातील असमानता, आदित्य ठाकरे यांचा 'नाईट लाईफ' प्रकल्पावर भाजपचे राजकारण, तसेच कोस्टल रोड प्रकल्पाचे श्रेय इतरांना देण्याचा प्रयत्न याबाबतही मुद्दे मांडले.

पत्रकारांना आवाहन

ठाकरे यांनी पत्रकारितेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करत, पत्रकारांना निष्पक्षपातीपणाने "दूध का दूध पाणी का पाणी" हे कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले. "आज जो 'अंधभक्त' वर्ग जन्माला आला आहे, त्या अंधभक्तांना दृष्टी देण्याचे काम करण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in