कल्याणमध्ये ठाकरेंची नवी खेळी; माजी महापौर रमेश जाधवही मैदानात, दरेकर की जाधव, लढणार कोण?

कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात सामना रंगणार असल्याचे सांगितले जात होते.
कल्याणमध्ये ठाकरेंची नवी खेळी;  माजी महापौर रमेश जाधवही मैदानात, दरेकर की जाधव, लढणार कोण?

विशेष प्रतिनिधी/मुंबई

कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात सामना रंगणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, एकीकडे श्रीकांत शिंदे यांच्यासारखा तगडा उमेदवार असताना ठाकरे गटाच्या दरेकर त्यांना टक्कर देऊ शकतील का, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यामुळेच आता कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर रमेश जाधव यांनाही ठाकरे गटाने उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितले. त्यामुळे आता ठाकरे गटाचा उमेदवार नेमका कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. कारण या मतदारसंघाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे प्रतिनिधित्व करतात. गेल्या दोन टर्मपासून ते या मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर एका तगड्या उमेदवाराची आवश्यकता होती. परंतु, ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिल्याने उलटसुलट चर्चा रंगली होती. त्यामुळेच आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट माजी महापौर रमेश जाधव यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर की रमेश जाधव लढणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ऐनवेळी वैशाली दरेकर यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून रमेश जाधव यांच्यामागे ठाकरे गट आपले संपूर्ण बळ पणाला लावतील, अशी चर्चा आहे.

दरम्यान, वैशाली दरेकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यामागेही एक महिला म्हणून चांगलेच बळ आहे. परंतु ते श्रीकांत शिंदे यांना तोडीस तोड लढत देणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. एवढेच नव्हे, तर ठाणे आणि कल्याण जागेवरून साटेलोटे तर झाले नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. खरे म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात या अगोदर राष्ट्रवादीने लढत दिलेली आहे. परंतु, यावेळी राष्ट्रवादीचे पाठबळही श्रीकांत शिंदे यांच्यामागे आहे. तसेच मनसेचे आमदार राजू पाटीलही त्यांच्या पाठीशी आहेत. अशावेळी येथील लढत एकतर्फी तर होणार नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु, श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात भाजपचा एक गट नाराज आहे. त्यामुळे त्यांची कितपत साथ मिळते, हादेखील प्रश्न आहे.

ठाकरेंचा सावध पवित्रा?

कल्याण लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. येथे मुख्यमंत्र्यांचे पुत्र मैदानात असल्याने ठाकरे गटाने त्यांच्या विरोधात सावध पवित्रा घेतला आहे. वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवून बिनविरोध निवडणूक काढण्याचा डाव आखला जाऊ शकतो. त्यामुळे अगोदरच सावध पवित्रा घेत उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर रमेश जाधव यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आदेश दिला आहे, अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेताना ठाकरे नेमके काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.

logo
marathi.freepressjournal.in