‘मविआ’त असंतोषाची ठिणगी; ठाकरे गटाचे १६ उमेदवार जाहीर, मित्रपक्षांत नाराजीचा सूर

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने बुधवारी १६ उमेदवार जाहीर केले. ते १७ वा उमेदवारदेखील जाहीर करण्याच्या तयारीत असून, ही जागादेखील मुंबईतील असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण-मध्य मुंबईत ते अनिल देसाई यांना मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहेत.
‘मविआ’त असंतोषाची ठिणगी; ठाकरे गटाचे १६ उमेदवार जाहीर, मित्रपक्षांत नाराजीचा सूर

विशेष प्रतिनिधी/मुंबई

ठाकरे गटाच्या शिवसेनेने बुधवारी लोकसभेच्या १६ उमेदवारांची यादी जाहीर केली. यावरून कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ईशान्य मुंबईत शिवसेनेने संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिल्याने शरद पवार गटात नाराजी असून, पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट ‘सिल्व्हर ओक’वर धडक देऊन संताप व्यक्त केला. दुसरीकडे सांगलीच्या जागेवरून कॉंग्रेस-शिवसेनेत राडा सुरू असून, माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या शिष्टमंडळाने थेट दिल्ली गाठली आहे. याशिवाय अमोल कीर्तीकर यांना वायव्य मुंबईतून तिकीट दिल्याने कॉंग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला असून, आठ दिवसांत आपण मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे महाविकास आघाडीत असंतोषाची ठिणगी पडली असून ती वाढण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने बुधवारी १६ उमेदवार जाहीर केले. ते १७ वा उमेदवारदेखील जाहीर करण्याच्या तयारीत असून, ही जागादेखील मुंबईतील असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण-मध्य मुंबईत ते अनिल देसाई यांना मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहेत. परंतु, कॉंग्रेसही सांगलीसह मुंबईच्या या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वाद उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सांगलीत कॉंग्रेसमध्ये नाराजी

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या हक्काचा होता. मात्र, शिवसेनेने तो कॉंग्रेससाठी सोडला. त्यामुळे शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रातील एक जागा हवी होती. त्यासाठी त्यांनी सांगलीच्या जागेवर दावा केला. परंतु, कॉंग्रेसने शिवसेनेला जागा देण्यास विरोध केला. कारण सांगलीची जागा ही कॉंग्रेसच्या हक्काची असून, येथून माजी मुख्यममंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याची भूमिका कॉंग्रेसने घेतली. माजी मंत्री विश्वजित कदम यांनी कॉंग्रेसलाच ही जागा मिळावी यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून, ते जिल्ह्यातील शिष्टमंडळासह थेट दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे सांगलीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

यासोबतच वायव्य मुंबईत शिवसेनेने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेवरही कॉंग्रेसचा दावा होता. मात्र, शिवसेनेने ही जागा कॉंग्रेसला देण्यास विरोध केला. जेव्हा येथील विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात दाखल झाले, तेव्हा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर ठाकरे गटासोबत राहिले. त्यामुळे त्यांना उमेदवारीचे बक्षीस मिळाले. परंतु याच जागेवरून कॉंग्रेसचे याच मतदारसंघातील माजी खासदार संजय निरुपम यांनी कीर्तीकर यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

संजय दिना पाटलांना शरद पवार गटाचा विरोध

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात सुसंवाद सुरू असतानाच ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी देताच राष्ट्रवादीचे नेते नाराज झाले असून, संजय दिना पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करीत या भागातील राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी थेट ‘सिल्व्हर ओक’वर धडक मारत संजय दिना पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे हा वाददेखील चिघळून आघाडीत बिघाडी होऊ शकते, अशी चर्चा आहे.

निरुपम यांचे बंडाचे संकेत

कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर होताच संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन कीर्तीकर यांच्या नावाला जोरदार विरोध केला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असून खिचडीचोर उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार नाही. कॉंग्रेस नेतृत्वाने शिवसेनेसमोर शरणागती पत्करली आहे, अशी टीका करीत त्यांनी, आता माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. त्यामुळे आठवडाभरात मोठी घोषणा करू, असा इशारा दिला. त्यामुळे शिंदे गटात किंवा भाजपात जाऊन ते कीर्तीकरांविरोधात मैदानात उतरू शकतात, असे बोलले जात आहे.

अमोल कीर्तीकरांविरुद्ध ईडीचा ससेमिरा

अमोल कीर्तीकर यांना वायव्य मुंबईतून ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर करताच त्यांना ईडीने टायमिंग साधत लगेचच नोटीस बजावली. त्यानंतर ईडीचे पथकही त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून, त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केल्याचे समजते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना गुंतवून ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in