
ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात कोरोनामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याने ठाणे शहरात भीतीचे वातावरण आहे. ठाणे महापालिका हद्दीत शुक्रवारपर्यंत कोरोनाचे १० नवे रुग्ण आढळले असतानाच, आता शनिवारी सकाळी एका २१ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
या तरुणाला मधुमेहाच्या त्रासामुळे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसांत कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णस्थितीची माहिती घेतली.
शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर म्हणाले की, "या तरुणाला मधुमेहचा आजार होता. त्याला गुरुवारी टाइप-१ मधुमेह आणि अॅसिडोसिसच्या गुंतागुंतीमुळे कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावत असल्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते आणि तिथे त्याला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. शुक्रवारी त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल शुक्रवारी रात्री आला. त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. यानंतर त्याला रुग्णालयातील विलगीकरण कक्षात हलविण्यापूर्वीच त्याचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला."
कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क रहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. तसेच, कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी सांगितले की, "या तरुणाला वयाच्या सातव्या वर्षापासून मधुमेहाचा आजार होता. मधुमेह आणि अॅसिडोसिसच्या गुंतागुंतीमुळे उपचारासाठी दाखल झालेल्या या तरुणांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाला होता. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल सकारात्मक आला होता."