अखेर बारवी धरण ओव्हर फ्लो

ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण काठोकाठ भरले असून बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
बारवी धरण ओव्हर फ्लो
बारवी धरण ओव्हर फ्लो
Published on

बदलापूर : संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण काठोकाठ भरले असून बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याला मोठा जल दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बारवी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारवी धरण भरण्यासाठी दहा दिवस विलंब लागला आहे. गेल्या वर्षी एक ऑगस्टच्या पहाटेच धरण भरून वाहू लागले होते, यंदा पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे धरण भरण्यास विलंब लागला. शुक्रवारी पहाटे बारवी धरण १०० टक्के भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

बारवी धरणातून पाणी बाहेर पडल्यानंतर बारवी नदीला पाण्याचा मोठा प्रवाह निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे या भागातील गावांना सतर्क राहण्याचा इशारा एमआयडीसी प्रशासनाने दिला आहे. बारवी धरण भरल्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या धरणावरच ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांनी नगरपालिका अवलंबून आहेत.

धरणाची क्षमता ३४०.४८ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. धरणाची उंची ७२.६० मीटर आहे. धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा निर्माण झाल्यावर धरणाचे सर्व ११ दरवाजे आपोआप उघडले जातात. धरण भरल्यामुळे आता सध्या धरणातून ४५ क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. बारवी धरणातून अंबरनाथ बदलापूर, उल्हासनगर महापालिका, कल्याण ग्रामीण, मीरा-भाईंदर, ठाणे एमआयडीसी, तळोजा एमआयडीसी या भागांना पाणीपुरवठा केला जातो.

logo
marathi.freepressjournal.in