

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सामूहिक अत्याचार आणि लूटप्रकरणातील वर्षभरापासून फरार असलेला २२ वर्षीय आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पुणे जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.
नायगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नागेश केशव गायकवाड (२२) असे आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये नोकरीच्या आमिषाने एका महिलेला खोलीत डांबून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याच्या प्रकरणात तो सहभागी होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो खरी ओळख लपवून अटक टाळत होता. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी त्याचा माग काढला. तो कामशेत परिसरात असल्याचे समजताच रविवारी त्याला ताब्यात घेण्यात आले.
नोकरीच्या आमिषाने सामूहिक अत्याचार
२७ नोव्हेंबर २०२४ रोजी पीडित महिला नोकरीच्या शोधात पुण्यात गेली होती. मुलाखत हुकल्यामुळे तिने तिच्या पतीचा मित्र पवन राजेंद्र प्रसाद सब्बत (२९) याच्याशी संपर्क साधला. त्याने नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत तिला ठाण्यातील मीरा रोड येथे बोलावले. तिथे सब्बतने तिला एका खोलीत डांबून ठेवले. तपासात समोर आले की सब्बत आणि त्याचे साथीदार धनराज चव्हाण (२१) व अभिषेक पुजारी (२२) यांनी त्याठिकाणी अनेक दिवस तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिचा मोबाईल, सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण सुमारे ७५ हजार रुपयांचा माल लुटल्याचा आरोप आहे. सब्बतने पीडितेच्या नावाचा वापर करून बनावट इंस्टाग्राम प्रोफाइल तयार करून तिचे फोटो अपलोड करून छळ केल्याचेही तपासात उघड झाले आहे.
गायकवाडकडून गुन्ह्याची कबुली, सर्व चार आरोपी अटकेत
नागेश गायकवाडवर पीडितेचा विनयभंग केल्याचा आणि लुटीत सहभागी असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सब्बत, चव्हाण आणि पुजारी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(म) (बलात्कार), ३०९(१) (दरोडा), ७० (सामूहिक बलात्कार), ७५(१)(४) (लैंगिक छळ) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक चौकशीत गायकवाडने गुन्ह्यातील सहभाग कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले असून पुढील तपास सुरू आहे.