राज्याच्या शैक्षणिक आणि भाषिक स्वायत्ततेवर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणाविरोधात ठाण्यात एक आगळेवेगळे चित्र पाहायला मिळाले. विविध राजकीय मतभेद बाजूला ठेवत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनी एकत्र येत हिंदी सक्तीविरोधात रविवारी आवाज उठवला. ठाण्यात, शहापूर, दिवा, उल्हासनगरमध्ये शासननिर्णयाची प्रतीकात्मक होळी करत मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी संयुक्त एल्गार करण्यात आला. या आंदोलनामुळे भाषेच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांची नव्याने जुळत चाललेली वीण राज्याच्या भविष्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम घडवू शकते.
ठाणे : केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याची सक्ती करण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्याच्या या प्रयत्नाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षांनी ठाणे शहरात एकत्र येत जोरदार आंदोलन केले.
रविवारी दुपारी जांभळी नाका चौकात हे आंदोलन पार पडले. या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले ‘शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी’, ज्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या हिंदी सक्तीविरोधातील नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी परिसरात ‘हिंदीची सक्ती बंद करा’, ‘मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही’, ‘मराठीला राष्ट्रभाषेचा दर्जा द्या’, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी हातात फलक, झेंडे घेत शासनाच्या निर्णयाविरोधात संतप्त रोष व्यक्त केला.
मराठीवर होणाऱ्या आक्रमणाविरोधात सर्व पक्षातील नेते, पदाधिकारी, नागरिक एकत्र आले. रविवारी देखील जांभळी नाका येथे जीआरची होळी करण्यात आली, ही ५ जुलैच्या मोर्चाची एक झलक होती. मराठीची गळचेपी करण्याचा भाजप व शिंदेंच्या शिवसेनाचा कुटील डाव मराठी माणूस एकवटून उधळणार आहे. डाॅक्टर, वकील, अभिनय अशा विविध क्षेत्रातील मराठीप्रेमी मोर्चात येण्यासाठी तयार आहेत.
संदीप पाचंगे, सरचिटणीस मनविसे
महाराष्ट्रात शिक्षण मराठीतूनच असावे, हे आमचे ठाम मत आहे. इतर भाषा शिकण्यास आम्ही विरोध करत नाही, पण ती सक्ती असू नये. मराठी माणसालाच आपल्या राज्यात परका बनवण्याचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नसल्याचे मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी म्हटले आहे.
नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले की, हा वाद केवळ भाषेचा नाही, तर महाराष्ट्रीय जनतेच्या अस्मितेशी निगडित आहे. केंद्र सरकारने जर या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला, तर याला व्यापक जनआंदोलनाच्या रूपात विरोध करण्यात येईल, असा इशारा दिला. आंदोलनामुळे जांभळी नाका परिसरात काही काळ वाहतूककोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवल्याने आंदोलन शांततेत पार पडले. या आंदोलनात विविध पक्षांचे महत्त्वाचे नेते सहभागी झाले होते.
ही फक्त भाषेची लढाई नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. मराठी ही राज्याची मातृभाषा असून तिच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या कोणत्याही धोरणाला आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू.
राजन विचारे, माजी खासदार
शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, तसेच काँग्रेस व इतर पक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनीत बऱ्हाटे / उल्हासनगर
महाराष्ट्र सरकारने नुकताच शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकविण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाने संपूर्ण राज्यात मराठीप्रेमी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र येत तीव्र आंदोलन केले. कॅम्प ४ येथील मध्यवर्ती शिवसेना शाखेसमोर शासन परिपत्रकाची जाहीर होळी करत सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे आणि मनसेचे स्थानिक पदाधिकारी यांनी केले.
हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करून मराठीवर अन्याय होतोय, हे आम्हाला मान्य नाही. या आंदोलनामुळे उल्हासनगरात एकजुटीनं उठलेला हा मराठी आवाज सर्वत्र पोहोचत असून, आगामी काळात अशा आंदोलनांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना व मनसेचा हा एकत्रित विरोध हे संकेत देतोय, की मराठी भाषेसंदर्भातील कुठलाही अन्याय आता निमूटपणे सहन केला जाणार नाही.
बंडू देशमुख, जिल्हाध्यक्ष मनसे
दिवा : दिवा शहरातील प्रभाग क्रमांक २८ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्य सरकारने लादलेल्या हिंदी सक्तीविरोधात तीव्र निषेध नोंदवत सरकारच्या हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली.
या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारचा विरोध करताना मराठी भाषेवरील अन्यायाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. "मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही", अशा निर्धारपूर्ण घोषणा देत स्थानिक कार्यकर्त्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. या आंदोलनात शिवसेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, विधानसभा संघटिका योगिता नाईक, दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील, उपशहर प्रमुख मारुती पडलकर, उपशहर संघटक शनिदास पाटील, विभाग प्रमुख संजय जाधव, योगेश निकम, हेमंत नाईक, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सुमित घरत/भिवंडी
राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती केली जात असून त्याविरोधात राज्यात जनक्षोभ उसळता आहे. या निर्णयास विरोध करण्यासाठी भिवंडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख मनोज गगे व शहर प्रमुख प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी अध्यादेशाच्या प्रतींची होळी करीत उग्र निदर्शने केली. तिसरी भाषा म्हणून हिंदी महाराष्ट्रावर लादण्यापेक्षा उत्तर भारतात भाजपने तिसरी भाषा सक्तीची करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांच्या वतीने जिल्हाप्रमुख मनोज गगे यांनी केली आहे. रविवारी दुपारी झालेल्या या आंदोलनात माजी शहरप्रमुख मोहन बल्लाळ, महिला संघटक वैशाली मेस्त्री, जिल्हा सचिव राजा पुण्यार्थी, तालुका युवासेना अधिकारी पंकज घरत, यांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बी.डी.गायकवाड/शहापूर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रद्रोही सरकारच्या वतीने मराठी भाषेवर होणाऱ्या आक्रमणाविरोधात हिंदी सक्तीचा जो शासकीय जीआर भाजप महायुती सरकारने काढलाय त्या शासकीय जीआरची होळी शहापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खर्डी शाखेसमोर करण्यात आली. यावेळी उपनेत्या ज्योती ठाकरे, जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, महिला आघाडी जिल्हा संघटिका रश्मी निमसे, तालुका प्रमुख कुलदीप धानके, सचिव रवींद्र लकडे, जिल्हा सहसचिव डॉ. अजित पोतदार, मराठी भाषाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाईंंदर : राज्य शासनाने शाळेत पहिलीपासून हिंदी सक्ती केली आहे. त्याविरोधात मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट चौकात शासनाने काढलेल्या आदेशाचे जीआर जाळत रविवारी आंदोलन केले.
गेल्या काही दिवसापासून पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्याची सक्ती शासनाने केली असल्याचा विरोधाकडून ओरड केली जात आहे, तर शासनाकडून हिंदी सक्ती केली नसल्याचे सांगितले जात आहे. हिंदी सक्तीविरोधात शिवसेना, मनसे व इतर पक्ष यांनी एकजूट करत ५ जुलै रोजी मुंबईत आंदोलन पुकारले आहे. रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी राज्यभर शासनाने हिंदी सक्तीचे काढलेल्या जीआर जाळून आंदोलन करण्यात आले आहे. मीरा-भाईंदरमध्ये देखील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आंदोलन केले आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला जिल्हा संघटक नीलम ढवण, मीरा-भाईंदर विधानसभा समन्वयक मनोज मयेकर, १४५ विधानसभा समन्वयक धनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख सुभाष केसरकर, ग्राहक संरक्षणचे सदानंद घोसाळकसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नवी मुंबई: कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांवर हिंदीची सक्ती लादू देणार नाही, असे ठणकावून सांगत रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवी मुंबई जिल्हा शाखेच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. संतप्त शिवसैनिकांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करून राज्य सरकारच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, उपनेते विठ्ठल मोरे आणि नवी मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख एम. के. मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, प्रवक्ते अनिश गाढवे, काँग्रेसचे अरविंद नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख अतुल कुळकर्णी, सुमित्र कडू आदी सहभागी झाले होते.