पाणी समस्या अधिक बिकट; १८ गावे, ६० वाड्यांची भिस्त एका टँकरवर

कर्जत तालुक्यातील १८ गावे आणी ६० वाड्यांसाठी केवळ एक टँकर मिळणार असल्याने गावऱ्यांची तहान भागणार तरी कशी असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे
पाणी समस्या अधिक बिकट; १८ गावे, ६० वाड्यांची भिस्त एका टँकरवर

(विजय मांडे)

कर्जत तालुक्यात डोंगरावर असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असते. उन्हाळयात कोरड्या पडणाऱ्या पोश्री आणि चिल्हार नदीच्या लगतच्या गावांमध्ये पाण्याची समस्या मार्च महिना सुरू झाल्यापासून जाणवू लागते. त्यात त्या ठिकाणी असलेल्या नळपाणी योजना कोलमडून पडत असल्याने तालुक्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न दरवर्षी गंभीर होत असतो. शासनाने पाणी टंचाईग्रस्त भागात टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. मात्र कर्जत तालुक्यातील १८ गावे आणी ६० वाड्यांसाठी केवळ एक टँकर मिळणार असल्याने गावऱ्यांची तहान भागणार तरी कशी असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.

पाणी टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये राहणाऱ्यांची पिण्याचे पाणी आणण्यासाठी होणारी पायपीट लक्षात घेवून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टँकरमधून पाणी पुरवठा करण्यात येतो. १८ गावे व ६० वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी एक टँकर आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे, मात्र एक टँकरचे पाणी किती दिवस आणी किती लोकांना पुरेल असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. नादुरुस्त असलेल्या विंधन विहिरीची दुरुस्ती करणे, तसेच विहिरींची दुरुस्ती आणि त्यातील गाळ काढणे याशिवाय नवीन विंधन विहिरी खोदण्याचे काम देखील कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी पाणी टंचाईवर परिस्थीती उद्भवणाऱ्या गावांचा समावेश करण्याची गरज आहे. सध्या पाणी टंचाईशी लढणाऱ्या १८ गावे आणि ६० आदिवासी वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी तालुक्यातील १६ गावे आणि ५६ आदिवासी वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवल्यानंतर संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता.

या वर्षी तालुक्यातील खांड्स, ओलमन, व वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा चेवणे, नांदगाव, तुंगी, ढाक, पेठ, अट निड, अंत्रट बरेडी, मोग्रज, पिंगळस, धामणी, खानंद, अंभेरपाडा, मोहोपाडा, भोपळेवाडी, सुतार पाडा, गरुड पाडा अशा १८ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर तालुक्यातील ६० आदिवासी वाड्यांमध्ये पाण्याची टंचाई भासणार असल्याने तेथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

कर्जत तालुक्यात शासकीय पहिला टँकर दाखल झाला आहे. तर ताडवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा केला गेला. पाणी समस्या तांडवाडी येथे कायम उद्भवत असल्याने येथील महिला रात्री विहरीवर रात्र झोपून काढत होत्या. तर याबाबत त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना भेटून आपली समस्या बोलून दाखवली होती. त्यानंतर तालुक्यात पहिला टँकर ताडवाडी येथे पोहचला असून टँकरचे पाणी विहरीत सोडण्यात आले. सध्या तीव्र पाणी टंचाई असलेल्या भागात टँकरने पाणी पोहचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यावेळी कर्जत पंचायत समितीचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गोवर्धन नखाते, कृषी विभागाचे चिंतामण लोहकरे यासह मोठ्या प्रमाणात ताडवाडी ग्रामस्थ महिला आदी उपस्थित होते. तर पाणी मिळाल्याने ग्रामस्थांनी देखील प्रशासनाचे आभार मानले आहेत.

दोन टँकरवर सगळ्या कृती आराखड्याचा भार

१८ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर तालुक्यातील ६० आदिवासी वाड्यांमध्ये पाण्याची टंचाई भासणार असल्याने तेथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी दोन टँकर या सगळ्या कृती आराखड्याचा भार वाहत असतात, त्यामुळे पाणी समस्या अधिक बिकट होऊ लागली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in