शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत गोंधळ; शिक्षकांमधून बदली प्रक्रियेवर संताप

शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत सावळागोंधळ समोर आला असून बदली प्रक्रियेत होत असलेल्या गोंधळामुळे शिक्षक वर्गात प्रचंड नाराजी आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत सावळागोंधळ समोर आला असून बदली प्रक्रियेत होत असलेल्या गोंधळामुळे शिक्षक वर्गात प्रचंड नाराजी आहे.

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया सुरू आहे. गुरुवार, १७ रोजी ठाणे जिल्हा परिषदेतील संवर्ग- एक मधील २५३ शिक्षकांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेमध्ये अनेक शाळांवर संच मान्यतानुसार मंजूर शिक्षक पदांपेक्षा अधिक शिक्षकांना बदली दिली असल्याची बाब समोर आली आहे. अशाच पद्धतीने बदली प्रक्रिया राबविली गेल्यास पुढे संवर्ग- दोन, तीन व चारच्या बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्यात बदलीस पात्र नसलेले शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरतील. परिणामी अवघ्या दीड-दोन महिन्यांतच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना बदली प्रक्रियेस सामोरे जावे लागणार असल्याने शिक्षकांमधून बदली प्रक्रियेवर संताप व्यक्त होत आहे.

राज्य शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविण्याचे कंत्राट खाजगी सॉफ्टवेअर कंपनी ‘विन्सी’ यांना दिले आहे. या कंपनीकडून शिक्षकांना मार्गदर्शन करताना शाळांमध्ये मंजूर पदसंख्या विचारात घेऊन शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये मंजूर पदापेक्षा अधिक शिक्षक बदली प्रक्रियेने पाठवले गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. १८ जून २०२४ च्या शासन निर्णय नुसार बदली प्रक्रियेसाठी सात टप्पे निश्चित करण्यात आले असून शिक्षकांची संवर्ग एक ते संवर्ग चार मध्ये विभागणी केली आहे. गुरुवारी संवर्ग एकच्या बदलीने ठाणे जिल्ह्यात अनेक शाळांवरील कार्यरत शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.

चुकीच्या प्रक्रियेने ससेहोलपट

संवर्ग-एक मध्ये अनेक दुर्धर आजारी, दिव्यांग,५३ वर्षांवरील शिक्षकांचा समावेश होतो. शासन निर्णयाने या संवर्गातील शिक्षकांना सोयीची शाळा निवडण्याचा किंवा बदलीस नकार देण्याचा अधिकार दिला आहे. परंतु हे शिक्षक अतिरिक्त ठरल्याने त्यांना बदली प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शासन निर्णयाने अधिकार दिला. परंतु चुकीच्या प्रक्रियेमुळे आमची ससेहोलपट होणार असल्याची भावना या संवर्गातील अनेक शिक्षकांनी व्यक्त केली.

बदलीच्या सावटाखाली

सुरू असलेली जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण होण्यास ऑगस्ट, सप्टेंबर महिना उजाडणार आहे. चुकीच्या बदली प्रक्रियेमुळे शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने लगेच अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या करून समायोजन करण्यासाठी पुन्हा बदली प्रक्रिया राबवावी लागेल. त्यामुळे वर्षभर शिक्षक बदलीच्या सावटाखाली राहून त्याचा शिक्षकांच्या अध्यापन कार्यक्षमतेवर परिणाम होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in