मुंबई /नवी दिल्ली : भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (ICSE Results 2024) आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) बोर्डाचा निकाल सोमवारी जाहीर केला. या परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून, निकालात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘आयसीएसई’ (दहावी) परीक्षेत ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील मानव्यविद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातून पहिला आला आहे. त्याला ९९.७५ टक्के (३९९/४००) गुण मिळाले आहेत.
देशातील निकालावर प्रकाश टाकल्यास दहावीच्या निकालात पश्चिम विभागाने तर बारावीच्या निकालात दक्षिण विभागाने प्रथम स्थान पटकावले आहे.
निकाल ९९.४७ टक्के
इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (आयएससीई) व ‘आयएससी’ बोर्डाचे निकाल रविवारी जाहीर झाले. दहावीचा निकाल ९९.४७ टक्के तर बारावीचा निकाल ९८.१९ टक्के लागला आहे.
दहावी परीक्षेत ९९.६५ टक्के मुले तर ९९.६५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बारावी परीक्षेत मुलांचा निकाल ९७.५३ टक्के तर मुलींचा निकाल ९८.९२ टक्के लागला आहे, अशी माहिती ‘आयएससीई’चे कार्यकारी प्रमुख व सेक्रेटरी जोसेफ इम्यॅन्युएल यांनी दिली. तसेच यंदापासून गुणवत्ता यादी जाहीर करणे मंडळाने बंद केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये अकारण स्पर्धा वाढू नये म्हणून हे पाऊल उचलेले आहे, असे त्यांनी सांगितले.
दहावी, बारावीच्या निकालात महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्याचा दहावीचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे, तर बारावीचा निकाल ९९.७१ टक्के लागला आहे. महाराष्ट्र्रातही मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. दहावीच्या निकालात ९९.९९ टक्के मुली तर ९९.९४ टक्के मुले तसेच बारावीत ९९.८६ टक्के मुली आणि ९९.५४ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.
देशसेवा करण्याचे स्वप्न
आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना रेहान म्हणाला की, "माझे आई-वडील आणि माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाले आहे. मला साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचायला नेहमीच आवडते. मला कविता आणि इतरही गोष्टींवर लिहायला आवडते. यूपीएससीच्या माध्यमातून भारतीय परराष्ट्र सेवेद्वारे देशाची सेवा करणे हे माझे स्वप्न आणि ध्येय आहे, असे तो म्हणाला.
शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा
दहावीच्या परीक्षेत देश आणि विदेशातील २६९५ शाळांनी सहभाग घेतला. त्यातील २ हजार २२३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे, तर बारावीच्या परीक्षेत १३६६ शाळांपैकी ९०४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.