कराड : कराड येथील मुजावर कॉलनीत बुधवारी सकाळी झालेल्या शक्तिशाली भीषण स्फोटाने परिसर हादरून गेला होता, तर यामध्ये नऊ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तब्बल चार घरे उद्ध्वस्त करणारा हा भीषण स्फोट नेमका कशामुळे झाला? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी बुधवारी दिवसभर कराड पोलिसांसह पुणे विभागीय फॉरेन्सिक टीम, स्थानिक गुन्हे शाखेसह बॉम्ब शोधक पथक तपास करत होते. अखेर हा स्फोट रात्रभर सिलिंडरमधून झालेल्या गॅसगळतीने झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पुण्याच्या फॉरेन्सिक टीमने काढला आहे. गॅसगळती झाल्याचे बरेच पुरावे पोलिसांसह या टीमच्या हाती लागले असून, नेमका अहवाल तीन दिवसानंतर येईल, अशी स्पष्टता शहर पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आणि अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या शरीफ मुल्ला, त्यांची पत्नी सुलताना मुल्ला, मुलगी जोया मुल्ला आणि मुलगा राहत मुल्ला यांच्या प्रकृती अजुनही चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
कराडच्या मुजावर कॉलनी येथील शांतीनगर परिसरात शरीफ मुबारक मुल्ला यांच्या घरात बुधवारी सकाळी उरात धडकी बसवणारा भीषण स्फोट झाला. या स्फोटाने आजूबाजूच्या चार घरांच्याही भिंती कोसळल्या. स्फोटात स्वतः शरीफ मुल्ला, त्यांची पत्नी सुलताना मुल्ला, मुलगी जोया व मुलगा राहत मुल्ला हे ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाजले असून, त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.