मोखाडा तालुक्यातील घाटमाथ्यांवर हरिनामाचा गजर, मोखाड्यातील घाटातून दिंड्यांचे त्र्यंबकेश्वरकडे मार्गक्रमण

खोडाळा-श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ६ फेब्रुवारीला होणाऱ्या संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी, वेगवेगळ्या भागातून पायी दिंड्या जातात. या दिंड्या आता मोखाड्यातील सूर्यमाळ-आमला आणि तोरंगण घाटातून मार्गक्रमण करत आहेत.
मोखाडा तालुक्यातील घाटमाथ्यांवर हरिनामाचा गजर, मोखाड्यातील घाटातून दिंड्यांचे त्र्यंबकेश्वरकडे मार्गक्रमण

मोखाडा : खोडाळा-श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ६ फेब्रुवारीला होणाऱ्या संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी, वेगवेगळ्या भागातून पायी दिंड्या जातात. या दिंड्या आता मोखाड्यातील सूर्यमाळ-आमला आणि तोरंगण घाटातून मार्गक्रमण करत आहेत. यावेळी घाटातील रस्त्यात, ठिकठिकाणी रिंगण आणि माऊलीचा गजर करत वारकरी तल्लीन होत आहेत. त्यामुळे माऊलीच्या गजराने, मोखाड्यातील डोंगरदऱ्या दुमदुमल्या आहेत. टाळ-मृदुंगाच्या गजराने अवघे जंगल मंगलमय झाले आहे.

शेकडो वर्षाची अखंडित परंपरा असलेल्या, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दिंड्या पायी घेऊन येतात. हीच परंपरा पालघर, ठाणे, जिल्ह्यातील आणि गुजरात हद्दीतील वारकऱ्यांनी जपली आहे. पालघर, वाडा, भिवंडी, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि गुजरात हद्दीतील वारकरी पायी दिंड्या घेऊन त्र्यंबकेश्वर येथे निघाले आहेत. या पायी दिंड्या आता मोखाड्यात दाखल होत आहेत. तर काही दिंड्या खोडाळा आणि मोखाडा येथे मुक्कामी राहून मार्गस्थ झालेल्या आहेत. शेकडोंच्या संख्येने वारकऱ्यांच्या दिंड्या रोजच येत आहेत. दिंडीतील महिला, पुरुष आणि अबालवृद्ध वारकरी घाटातील रस्त्यांमध्ये टाळ, मृदुंगाच्या तालावर तल्लीन होऊन माऊलीचा गजर करत आहेत. कुठे रिंगण करून महिला फुगड्या खेळत आहेत. त्यामुळे मोखाड्यातील तोरंगण आणि सूर्यमाळ-आमला घाटात वातावरण भक्तीमय झाले असून माऊलीच्या गजराने डोंगरदऱ्या दुमदुमल्या आहेत.

मोखाड्यात भक्तिमय वातावरण

वारकरी दिंड्या त्र्यंबकेश्वरकडे जात असताना, खेडोपाडी, आणि रस्त्यालगतच्या गावात मुक्काम करतात. त्यावेळी दमलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यांवर थोडाही शीण जाणवत नाही, त्याचे कारणही तसेच आहे, प्रत्येक मुक्कामी कीर्तन आणि भारूडाचा कार्यक्रम रंगत असतो. या कार्यक्रमाने सर्व वारकऱ्यांचा शीण नाहीसा होतो. यावेळी प्रत्येक गावांगावांतून गावकरी तसेच काही भाविक व्यक्तीशः नाथभक्तांसाठी प्रीतिभोजनाचे आयोजन करत असतात. सकाळी पुन्हा वारकरी थंडी, ऊन आणि वारा याची परवा न करता त्र्यंबकेश्वरकडे पुढे जात आहेत. एकूणच मोखाडा तालुक्यात यात्रोत्सवाच्या अगोदरपासूनच भक्तिमय वातावरण असते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in