
मुंबई : शिवसेनेने २०१४ मध्ये १५१ जागा लढवण्याची घोषणा केली. त्यात एकही जागा कमी होणार नाही, अशी घोषणा शिवसेनेच्या युवराजांनी केली होती. त्यामुळेच भाजप-शिवसेना युती तुटली, असे शरसंधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
२०१४ सालची शिवसेना-भाजप युती तुटण्याची अंतर्गत बाब प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणली. फडणवीस म्हणाले की, २०१४ मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यावेळी १५१ जागांवर अडून बसली, तर भाजप १२७ जागांवर लढण्याची तयारी करत होती व उर्वरित जागा या मित्रपक्षांना सोडणार होती. पण भाजपचा हा प्रस्ताव शिवसेनेने नाकारला. एकसंघ शिवसेनेशी युती झाली असती तर आताची स्थिती वेगळी असती. २०१४ मध्ये शिवसेनेने एक राजकीय चूक केली नसती तर उद्धव ठाकरे यांचा पक्षही फुटला नसता आणि युती पण तुटली नसती. त्यांनी मागील दहा वर्षांतील आठवणींना उजाळा देताना त्या एका चुकीमुळे आणि पाच जागांच्या खेळीमुळे राज्यातील राजकारणाने मोठी कूस बदलली, असे ते म्हणाले.
सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांच्या सत्कार समारंभावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. शिवसेनेला तेव्हा १४७ जागा देण्यास आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल व आमचा उपमुख्यमंत्री होईल हे ठरले होते, असे फडणवीस यांनी सांगितले. मात्र, उद्धव ठाकरे हे १५१ वर ठाम राहिले आणि युती तुटली, असे फडणवीस म्हणाले.
कदाचित, मलाच मुख्यमंत्री बनायचे होते!…
आमचे दोघांचेही मिळून २०० च्या वर आमदार निवडून येतील, असे आम्हाला वाटत होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री तर आमचा उपमुख्यमंत्री बनेल, असे ठरले होते. पण विधात्याच्या मनात काही वेगळेच होते. कदाचित मलाच मुख्यमंत्री बनायचे होते, असे फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासार्हतेमुळे कमी वेळात पहिल्यांदाच आम्ही २६० जागा लढलो, त्याआधी आम्ही ११७ पेक्षा जास्त जागा लढलोच नाही. २६० जागा लढलो आणि तेव्हापासून आम्ही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उभा राहिलो. तेव्हापासून आजपर्यंत शंभरचा आकडा पार करणारा राज्यातील मागील ३० वर्षांतील भाजप हा एकमेव पक्ष आहे, असे ते म्हणाले.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमुळे युती तुटली - राऊत
२०१४ साली एका-एका जागेवर ७२-७२ तास चर्चा झाली होती. त्यात मी होतो. भाजपचे प्रभारी ओम माथुर होते. आम्ही त्यांचा सगळा खेळ पाहत होतो. पण मी एक नक्की सांगेन, की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना-भाजप युती तुटू नये, या मताचे होते. तेव्हा युतीसंदर्भात त्यांची भूमिका सकारात्मक होती, तरीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमुळे युती तुटली, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले.
मग पक्षश्रेष्ठींनी घेतला निर्णय?
शिवसेनेसोबत आमची बोलणी सुरू होती. आम्ही त्यांना जास्त जागाही द्यायला तयार होतो. त्यांनी आपल्या मनात १५१ चा आकडा पकडला होता. तेव्हा ओमप्रकाश माथुर यांनी अमित शहा यांच्यासोबत बोलणे केले आणि सांगितले की, अशाप्रकारे चालणार नाही. अमित शहा
यांनी पंतप्रधानांसोबत चर्चा केली. तेव्हा ठरले की, आम्ही १२७ आणि ते १४७ असा फॉर्म्युला ठरला तर युती होईल, नाहीतर युती राहणार नाही. तेव्हा मी अमित शहा आणि ओमप्रकाश माथुर यांना आत्मविश्वास होता की आम्ही लढू शकतो. बाकी पक्षात कोणाला आत्मविश्वास नव्हता. या विश्वासाच्या जोरावर आम्ही शिवसेनेला अखेरचा इशारा दिला होता, असे फडणवीस म्हणाले.